25 November 2017

News Flash

‘सीपीएल’वरुन सोशल मीडियावर प्रिती झिंटा ट्रोल!

अनेक ट्विपल्सने तिला याबाबत उलट-सुलट प्रश्न विचारायला सुरूवात केली

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 12, 2017 9:29 AM

प्रिती झिंटा

आयपीएलमध्ये प्रिती झिंटा हे नाव काही नवे नाही. तिच्या पंजाब टीमने आतापर्यंत आयपीएलमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. आयपीएल दरम्यान आपल्या संघाला प्रोत्साहित करताना ती नेहमीच दिसते. मैदानावरील तिचे असणेच तिच्या चाहत्यांसाठी सुखावणारे असते. आयपीएलमुळे प्रितीला क्रिकेट विश्वातील घडामोडींबद्दल माहिती असते. अनेकदा ती सोशल मीडियावर क्रिकेट संदर्भात चर्चा करतानाही दिसते. पण यावेळी मात्र कॅरेबियन प्रिमिअर लीगबद्दल बोलताना प्रितीचे अज्ञान पुढे आले आणि मग काय सर्वांनी तिला घेरले.

त्याचे झाले असे की, प्रिती ट्विटरवर चाहत्यांसोबत गप्पा मारत होती. एका चाहत्याने तिला ट्रिनबॅगो नाइट रायडर्स आणि सेंट किट्स अॅण्ड नेवीस पॅट्रीओट्स यांच्यातील अंतिम सामन्याबद्दल काही बोलायला सांगितले. या सामन्याबद्दल प्रितीला काही माहित नसावे, तरीही तिने टीके रायडर्स टीमला सामन्यासाठीच्या शुभेच्छा दिल्या. पण टीके रायडर्स आणि सेंट किट्स अॅण्ड नेवीस पॅट्रीओट्समधील सामना केव्हाच संपला होता. प्रितीने सोशल मीडियावर दाखवलेल्या अज्ञानामुळे तिला अनेकांनी ट्रोल केले. अनेक ट्विपल्सने तिला याबाबत उलट-सुलट प्रश्न विचारायला सुरूवात केली.

गेली अनेक वर्षे प्रितीचा एकही सिनेमा आला नव्हता. प्रितीचे सारे लक्ष आयपीएल आणि इतर कामांमध्ये होते. त्यात प्रितीने लग्न केल्याची चर्चा सुरू झाली. तिने सिनेसृष्टीला ‘रामराम’ केले असेच अनेकांना वाटले होते. पण आता ती ‘भैयाजी सुपरहिट’ या सिनेमातून पुनरागमन करत आहे. या सिनेमात तिच्यासोबत ‘ढाई किलो का हाथ’ म्हणजे सनी देओल असणार आहे. याआधी सनी देओलचे दिग्दर्शन असणाऱ्या ‘दिल्लगी’मध्ये प्रिती पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती. याशिवाय, ‘फर्ज’, ‘ये रास्ते है प्यार के’, ‘द हिरो’ यांसारख्या सिनेमात ही जोडी याआधीही पाहायला मिळाली आहे.

First Published on September 12, 2017 9:29 am

Web Title: preity zinta trolled on twitter for her blunder on cpl final