मनुष्यप्राणी कितीही व्यवहारी असला तरी ‘प्रेम’ या एका गोष्टीच्या बाबतीत मात्र त्याची मती नेहमीच गुंग होताना दिसते. त्यात व्यावहारिक लाभ पाहणारे सहसा आढळत नाहीत. परंतु आजच्या व्यक्तिवादी जमान्यात प्रेमातही ‘व्यवहार’ पाहणाऱ्यांचं प्रमाण वाढताना दिसत असलं, तरी खऱ्या प्रेमात व्यवहार असूच शकत नाही. तसा तो असेल, तर ते काही खरं प्रेम नव्हे. प्रेम सगळेच करत असले तरी ते करणाऱ्याच्या वृत्ती-प्रवृत्तीनुसार त्यातही प्रतवारी असते. परंतु कविवर्य मंगेश पाडगांवकरांनी प्रेमावर एक कविता करून मोठ्ठाच घोळ घालून ठेवलाय. त्यात ते म्हणतात- ‘प्रेम.. प्रेम असतं.. तुमचं आमचं सर्वाचंच सेम असतं.’ असं लिहिताना ते कुठल्या धुनकीत होते कुणास ठाऊक. कदाचित उच्च, उदात्त, तरल संवेदनांच्या तंद्रीत त्यांच्याकडून बहुधा अनवधानानं असं लिहिलं गेलं असावं. पाडगांवकर म्हणतात ते खरं असतं तर जगातल्या यच्चयावत प्रेमिकांचं प्रेम यशस्वी नसतं का झालं? मग प्रेमभंग, घटस्फोट वगैरे घडतेच ना! पण वस्तुस्थिती तशी नाहीए. पाडगावकरांच्या या निसरडय़ा विधानावर विसंबून लेखक-दिग्दर्शक-निर्माते संतोष आंबेरकर यांनीही चक्क त्यांचीच री ओढत ‘प्रेम.. प्रेम असतं’ हे नाटक लिहिलंय आणि तेही पाडगांवकरांप्रमाणेच तोंडघशी पडलेत.
म्हणजे झालंय असं की, या नाटकात प्रेमिकांच्या दोन जोडय़ा दाखवून त्यांनी त्यांचं प्रेम कसं सेम आहे, हे दाखवायचा प्रयत्न केलाय. परंतु मुदलात त्यांनी तुलनेसाठी म्हणून ज्या जोडय़ा निवडल्यात, त्यांच्या आयुष्यातले तिढेच इतके भिन्न आहेत, की हे शक्यच नाहीए.
यातलं पहिलं जोडपं नीलम आणि प्रीतम. प्रीतम प्रथितयश साहित्यिक. तर नीलम बॅंकेत नोकरी करणारी साधी स्त्री. दोन वर्षांच्या प्रणयाराधनानंतर त्यांनी लग्न केलंय. आणि आता त्यांच्या लग्नाला तब्बल १८ वर्षे लोटलीयत. परंतु या प्रदीर्घ वैवाहिक जीवनात त्यांच्यात सतत भांडणंच होताहेत. त्याचं कारण : त्यांच्या स्वभावांतलं महदंतर. प्रीतम सरळ-साधा, शांत वृत्तीचा. तर नीलम क्षुल्लक गोष्टीतही पराचा कावळा करून डोक्यात राख घालून घेणारी. कांगावखोर. तिच्या अशा स्वभावामुळे प्रीतमला प्रचंड मन:स्ताप होत असला तरी तो शक्यतो त्याकडे दुर्लक्षच करायचा प्रयत्न करतो. परंतु कधी कधी त्याच्याही सहनशक्तीच्या बाहेर गेल्यावर तोही चिडतो आणि त्यांच्यात भांडणं होतात. मूल नसणं हाही त्यांच्यातले बंध सैल होण्याचं एक कारण आहेच.
एका साहित्य पुरस्कार सोहळ्यात प्रीतमला पुरस्कार प्रदान केल्यानंतर माधुरीदेवी त्याला औपचारिकतेनं जवळ घेतात आणि हे दृश्य बातम्यांत पाहिल्यावर नीलमचं टाळकं सणकतं. त्या दोघांचे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करून ती प्रीतमला चांगलंच फैलावर घेते. प्रीतमनं, ‘आमच्यात तसं काही नाहीए,’ असा खुलासा करूनही तिचं अद्वातद्वा बोलणं कमी होत नाही. शेवटी प्रीतमचाही स्फोट होऊन तो आपण वेगळं होऊया असं तिला सांगतो. तेव्हा मात्र नीलम हादरते. इतक्या वर्षांच्या मानसिक छळामुळे मेटाकुटीला आलेल्या प्रीतमच्या सहनशक्तीचा त्या दिवशी कडेलोट होतो आणि तो याउप्पर वेगळं व्हायचा निर्णय घेतो. नीलमनं झाल्या प्रकाराबद्दल माफी मागूनही तो आपल्या निर्णयावर ठाम राहतो.
शेवटी दोघं वेगळे होतात. पण प्रीतमला वेगळी जागा घेणं परवडणारं नसल्यानं त्याच फ्लॅटमध्ये दोघं वेगवेगळं राहायचं ठरवतात. परस्परांच्या बंधनातून मुक्त झाल्यानं प्रीतम सुटकेचा नि:श्वास सोडतो. आता तो त्याला हवं तसं आयुष्य जगायला मोकळा असतो. मात्र, नीलमला या नव्या व्यवस्थेत रुळणं जड जातं. पण आता माघारीचे सगळे दोर कापलेले असल्यानं तिचेही जुळवून घेण्याचे प्रयत्न जारी असतात.
नीलम प्रीतमला खिजवण्यासाठी आपल्या एका तरुण मित्राला- राहुलला पेइंग गेस्ट म्हणून घरी राहायला बोलावते. पण प्रीतम शांतपणे तिचा हा निर्णय स्वीकारतो. पुढे उलट राहुल आणि प्रीतम एकमेकांचे चांगले मित्र बनतात. नीलमचा प्रीतमला डिवचण्याचा हेतू साध्य होत नाही. प्रीतमही पूनम या होतकरू लेखिकेला मार्गदर्शनासाठी आपल्याकडे राहायला बोलावतो. तिला पाहून नीलमचं माथं फिरतं. परंतु आता ते वेगळे झालेले असल्यानं प्रीतमला ती आडकाठीही करू शकत नाही. मनोमनी तिचा जळफळाट मात्र होत राहतो. प्रीतम आणि पूनमचं मोकळंढाकळं वागणं आणि एकत्र राहणं नीलमला सहन होत नाही. पण काही करणंही शक्य नसतं. शेवटी सारं असह्य़ होऊन ती पूनमला एके दिवशी फैलावर घेतेच. त्यांच्या संबंधांबद्दल तिला खडसून जाब विचारते. पूनमही तिला तोडीस तोड उत्तरं देत खरं काय ते सांगून टाकते. ते ऐकून नीलमचा पारा चढतो. आणि..
कथानकात पुढे आणखीनही वळणंवाकणं येतात. कोणती, ते प्रत्यक्ष नाटकात पाहणंच उचित.
लेखक-दिग्दर्शक संतोष आंबेरकर यांनी एक बेतीव कथा या नाटकात सादर केली आहे. तिचं बेतलेपण ठायी ठायी जाणवतं. प्रेक्षकांची चार घटका करमणूक करणं हा त्यांचा हेतू आहे. आणि त्यात नाटक बऱ्यापैकी यशस्वी झालंय, हेही खरंय. परंतु चिकित्सक नजरेतून पाहिल्यास नाटकात संहितेपासून सादरीकरणापर्यंत अनेक दोष दिसतात. १८ वर्षांच्या छळवादी सहजीवनानंतर विभक्त झालेल्या जोडप्यात पुन्हा एकत्र येण्यासाठी लागणारे तरल भावबंध उरतील का, हा प्रश्न राहून राहून पडतो. तसे काही नाजूक धागे त्यांच्यात उरले असते, तर मुळात ते वेगळेच होते ना! त्यामुळे लेखकमहाशयांना त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी एकाच घरात परस्परांच्या सान्निध्यात ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हतं. एक मात्र खरंय, की वेगळं झाल्यावरही ज्या तऱ्हेनं नीलम प्रीतमला त्याच्या वागण्याबद्दल जाब विचारते, त्याच्याशी भांडण उकरून काढते, त्यावरून ‘हम नहीं सुधरेंगे’ या वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तबच होतं. इतक्या क्लेशदायी वैवाहिक आयुष्यानंतर कुणालाही जोडीदाराबद्दल प्रेम वा आस्था वाटणं असंभवच. पण इथं मात्र तसं घडताना दाखवलं आहे. म्हणूनच हे नाटक खोटं वाटतं. यातली अन्य पात्रं- राहुल आणि पूनम- हीसुद्धा प्रमेय सिद्ध करण्यासाठी आधीच उत्तर तयार करून त्यावर आधारीत सिद्धान्त मांडण्यासाठी योजिली आहेत. त्यामुळे त्यांचं परस्परांत गुंतणं, त्यांची लुटूपुटूची भांडणं समांतरपणे यात येतात. त्या पाश्र्वभूमीवर या उभयतांना आपल्या भांडणांतली वैय्यथ्र्यता कळून चुकणं, हे मात्र ‘टू मच्’च! नीलम व प्रीतमला पुन्हा एकत्र आणण्याचा विडाच लेखकानं उचललेला असल्यानं अखेरीस त्यांनी नाटकाला एक भावप्रक्षुब्ध कलाटणी दिलेली आहे. ती कितीही मेलोड्रॅमॅटिक असली तरी भाबडय़ा प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी उभं करते, निश्चित.
मुळात यातल्या पात्रांना स्वत:ची अशी भूमीच नाहीए. प्रीतमला साहित्यिक दाखवलेलं असलं, तरी त्याचं लेखकपण कुठंच प्रत्ययाला येत नाही. तो चारचौघांसारखाच एक सामान्य माणूस वाटतो. पहिल्याच प्रवेशात बायकोनं संशय घेतल्यावर तो सामान्यांसारखाच रिअ‍ॅक्ट होतो. त्याचं पुरस्कारप्रसंगीच्या वागण्याचं हास्यास्पद समर्थन कुठलाही संवेदनशील लेखक देणं शक्य नाही. पूनम हीसुद्धा एक होतकरू लेखिका असल्याचं नाटकात दाखवलंय. ती ‘नवनिर्वाचित लेखिका’ आहे. म्हणजे काय? ‘नवनिर्वाचित’ म्हणजे ‘नव्याने निवडून आलेला/ली’! या शब्दाचा हा अर्थही जर लेखकाला माहीत नसेल तर तो धन्यच होय. ती लेखिका आहे, हे लेखक सांगतो म्हणूनच आपण मानायचं. बाकी तिच्यात होतकरू लेखिकेची कसलीही लक्षणं दिसत नाहीत. नाटकात मधे मधे पेरलेले निवेदनाचे तुकडेही बाळबोध वाटतात. त्यांची काहीच गरज नव्हती. दिग्दर्शक म्हणून आंबेरकरांनी साफसुथरा प्रयोग बसवलाय. लेखकाच्या चुका वा संहितेतल्या त्रुटी वा दोष दोघंही एकच व्यक्ती असल्यानं सुधारण्याची शक्यता अशक्यच.
नेपथ्यकार प्रवीण गवळींनी घटस्फोटाने रस्त्यावर येऊ शकणाऱ्या साहित्यिकाचं आलिशान घर उभं केलंय. त्यामुळे संहितेतला दोष छान अधोरेखित झाला आहे. अरुण कानविंदे यांच्या पाश्र्वसंगीताने या मेलोड्रामातील नाटय़पूर्णता गहिरी केली आहे. प्रकाशयोजनाकार सुनील देवळेकरांनी नाटय़ांतर्गत मूड्स ठळक केले आहेत.
हे नाटक तारलं आहे ते अशोक शिंदे आणि मैथिली वारंग या अनुभवी कलावंतांनी! अशोक शिंदेंनी संयमित, परंतु आपल्या भूमिकेवर ठाम असणारा प्रीतम उत्तम वठवला आहे. सतत कांगावखोरपणे वागणाऱ्या बायकोपुढे पुरता हतबल झालेला, मूल नसण्याच्या अधुरेपणातून आतल्या आत विद्ध झालेला नवरा त्यांनी नेमकेपणानं साकारलाय. प्रीतमचं खेळकरपण आणि गांभीर्य दोन्ही त्यांनी योग्य तऱ्हेनं व्यक्त केलंय. मैथिली वारंग यांनीही नीलमची संशयी व कांगावखोर वृत्ती अचूक टिपलीय. कसलाही विचार न करता टोकाला जाणारी आणि विभक्त झाल्यानंतर नवऱ्यातल्या आपल्या गुंतलेपणाची तीव्रतेनं जाणीव होऊन त्याला पुन्हा आपलंसं करण्यासाठी धडपडणारी स्त्री त्यांनी तिच्या उत्स्फूर्तपणासह मस्त रंगवली आहे. छान छान, गोड गोड वागणं ज्यांच्या वाटय़ाला आलं आहे अशा पूनम आणि राहुलची भूमिका अनुक्रमे गौरी देशमुख आणि पंकज खामकर यांनी सफाईनं निभावली आहे. परंतु त्यातली कृतकता लपत नाही.   
फार खोलात विचार न करता हे नाटक पाहिलं तर चार घटका टाइमपास होतो. परंतु त्याच्या खोलात गेलात तर मात्र निराशा पदरी पडते.