बॉलीवूड आणि बॉलीवूडमधील चित्रपटांतील गाणी हे एक अतूट असे समीकरण आहे. आपण भारतीय प्रेक्षक गाण्यांशिवाय चित्रपट ही कल्पनाच करू शकत नाही. एकही गाणे नाही, असा प्रयोग बॉलीवूडच्या काही चित्रपटात करण्यातही आला मात्र तो यशस्वी झाला नाही. बॉलीवूडच्या इतिहासात ‘प्रेम रतन धन पायो’च्या निमित्ताने चक्क तेरा मिनिटांचे एक गाणे प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून हे गाणे अभिनेता सलमान खान याने गायले आहे.
चित्रपट संगीत ही आपल्या भारतीयांची विशेष आवडीची बाब आहे. कृष्णधवल चित्रपटांच्या काळापासून ते अगदी आत्ताच्या चित्रपटांवर धावती नजर टाकली तर त्यात असलेली गाणी हा चित्रपटाचा मुख्य प्राण असल्याचे दिसून येते.
सलमान खानच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातील तेरा मिनिटांच्या प्रदीर्घ गाण्याची सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे. सलमान खान आणि सोनम कपूर यांच्यावर या चित्रपटासाठी एक गाणे चित्रित करण्यात आले असून चित्रपटातील हे गाणे सलमान खान यानेच गायले आहे. या गाण्याचे खास वैशिष्टय़ म्हणजे हे संपूर्ण गाणे तेरा मिनिटांचे आहे. या गाण्याच्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये लांबलचक असलेल्या गाण्यांच्या यादीत आता या नव्या गाण्याची भर पडणार आहे.
सुरज बडजात्या दिग्दर्शित ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातील तेरा मिनिटांच्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. सुरज बडजात्या यांच्या ‘हम आपके कौन है’ चित्रपटात एक, दोन, तीन नव्हे तर चक्क १४ गाण्यांचा समावेश होता. चित्रपटात गाण्याच्या माध्यमातून ‘अंताक्षरी’ सुरू करण्याची पद्धतही सुरज बडजात्या यांनीच सुरू केली आहे.
या चित्रपटात सलमान ‘प्रेम’ ही व्यक्तिरेखा साकारत असून त्याच्याबरोबर नील नीतीन मुकेश, स्वरा भास्कर, अरमान कोहली आदी कलाकार आहेत.