लग्नसोहळा आणि मुख्यत्वे कुटूंबव्यवस्था याच विषयांवर चित्रपट बनविणाऱ्या बडजात्या यांचा ‘प्रेम रतन धन पायो’ हा नवा सिनेमा म्हणजे जुन्याच गोष्टींचे अतिशय चकाचक, भरजरी, भव्य सेट्सचे वेष्टन केलेला सिनेमा म्हणता येईल. फक्त भव्य सेट्स, अतिशय कलाकुसर केलेले शीशमहल, राजवाडे, भरजरी, राजेशाही रंगीबेरंगी कपडेपट एवढेच या सिनेमात आहे. गोष्ट, त्यासाठीची पटकथा, संवाद यांचा संपूर्ण अभाव असलेला हा सिनेमा फक्त भव्य सेट्स दाखविण्यापलिकडे प्रेक्षकांची निखळ करमणूक करण्यात सपशेल अपयशी ठरतो. फक्त भव्य सेट्स दाखविण्याचा जमाना केव्हाच मागे पडला हे चित्रपटकर्ते पार विसरून गेले आहेत.

बडजात्यांचा सिनेमा आणि सलमान खान सिनेमाचा नायक म्हटला की प्रेक्षकांना हमखास त्यांच्या आधीच्या सिनेमांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना बऱ्याच कालावधीनंतर बडजात्यांचा दिवाळी धमाका सिनेमा पाहण्याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली असली तरी पटकथा लेखन-दिग्दर्शन-संवादलेखन तसेच गीते-संगीत या सर्व बाबतीत प्रेक्षकांच्या पदरी प्रचंड निराशा येते.
सलमान खानची दुहेरी भूमिका आहे हे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच प्रेक्षकांना माहीत होते. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार ही उत्सुकता प्रेक्षकांना होती. मात्र, बडजात्यांच्या आधीच्याच सिनेमाच बराचसा प्रभाव या सिनेमावर असून तब्बल १६१ मिनिटे लांबीच्या या सिनेमात भरजरी कपडे, भव्य सेट्स यापलिकडे काहीच प्रेक्षकांच्या हाती लागत नाही.
राजतिलक समारंभ होऊन विजय सिंग हा आता राजा बनणार आहे. समस्त नगरी त्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र विजय सिंगचा सावत्र भाऊ अजय सिंग हा संपत्तीतील वाटा मिळण्यासाठी आणि राजेपद स्वत:ला मिळावे यासाठी एक कट रचतो. या कटात विजय सिंगचा जीव घेण्याचे तो ठरवितो. परंतु, त्या जीवघेण्या हल्ल्यातून विजय सिंग वाचतो मात्र गंभीर आजारी पडतो. राजकुमार विजय सिंगचा विवाह ज्या राजकुमारीशी ठरला आहे. राजतिलक समारंभ तीन दिवसांवर आला असताना काय करायचे या संभ्रमात पडलेल्या दिवानजीना अचानक प्रेम दिलवाले हा रामलीला सादर करणारा युवक भेटतो जो हुबेहूब विजय सिंग यांच्यासारखा दिसणारा आहे. मग विजय सिंग बनून प्रेम दिलवाले राजघराण्यात प्रवेश करतो आणि पुढे अपेक्षित गोष्टी घडतात.
आजचा समाज बदलला आहे, काळ बदलला आहे, त्यानुसार प्रेक्षकाची अभिरूची बदलली आहे हे चित्रपटकर्ते पुरते विसरून गेले आहेत हेच चित्रपट पाहताना सतत प्रेक्षकांना जाणवत राहते. उत्कंठावर्धक प्रसंग नाहीत, संवाद प्रभावी नाहीत, सर्व प्रमुख व्यक्तिरेखांचे तकलादू लेखन आणि मांडणी, गीत-संगीतामध्ये कोणतेही गुणगुणावे असे गाणे नाही असा सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारला आहे.

प्रेम रतन धन पायो
निर्माता – अजित कुमार बडजात्या, कमल कुमार बडजात्या, राजकुमार बडजात्या
दिग्दर्शक – सूरज बडजात्या
कथा- पटकथा – सूरज बडजात्या
छायालेखक – व्ही. मणिकंदन
संगीत – संजय चौधरी, हिमेश रेशमिया
संकलक – संजय संकला
कलावंत – सलमान खान, सोनम कपूर, अनुपम खेर, दीपक डोब्रियाल, नील नीतीन मुकेश, अरमान कोहली, स्वरा भास्कर, आशिका भाटिया, संजय मिश्रा, लता सभरवाल, सुहासिनी मुळ्ये, एस. एम. झहीर व अन्य.