अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घटनादुरुस्तीमध्ये महत्वाचा बदल केला असून साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणुकच कायमस्वरुपी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यापुढे संमेलनाध्यक्ष संलग्न संस्था आणि विद्यमान अध्यक्षांनी सुचविलेला व्यक्ती अध्यक्ष असेल यावत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यावर्षीच्या संमेलनापासूनच निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याच्या वृत्ताला श्रीपाद जोशी यांनी दुजोरा दिला. यवतमाळ येथे ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनापासूनच संमेलनाध्यक्षाची निवड नव्या पद्धतीने होणार आहे.

आतापर्यंत साहित्य महामंडळाचा भाग नसलेल्या पण आता त्याचा भाग होऊ इच्छिणाऱ्या संस्थांना आता महामंडळाचे दरवाजे खुले होणार असल्याचेही जोशी म्हणाले. घटक संस्था, संलग्न संस्था, समाविष्ट संस्था, संमेलन निमंत्रक संस्था आणि विद्यमान संमेलन अध्यक्ष हे नव्या अध्यक्षपदासाठी नावे सुचवतील. त्यातूनच सर्वानुमते संमेलनाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल असेही ते म्हणाले. यंदाच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी संमेलनस्थळ असलेल्या यवतमाळ येथे २८ ऑक्टोबर रोजी महामंडळाची बैठक होणार आहे. यात महामंडळाकडे आतापर्यंत आलेल्या नावांवर चर्चा करण्यात येईल.