भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनयाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे दोन दिग्गज कलाकार ज्येष्ठ अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील वडिलोपार्जित घरांची किंमत पाकिस्तान सरकारने निश्चित केली आहे. पाकिस्तानमध्ये असणारी दोघांची वडिलोपार्जित घरं बर्‍याच काळापासून चर्चेत आहेत. ही दोन्ही घरं राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केल्यापासून प्रांतीय सरकार (राज्य सरकार) त्यांना खरेदी करण्याच्या तयारीमध्ये होते. आता पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारने मोठा निर्णय घेत या दोन्ही घरांची किंमत ठरवली असल्याचे समोर आले आहे.

‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप कुमार यांचे चार मारला येथे घर आहे. त्या घराची किंमत ८०.५६ लाख रूपये आहे, तर राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घराची किंमत ही दीड कोटी रूपये ठरवण्यात आली आहे. कम्युनिकेशन अँड वर्क्स डिपार्टमेंटने दिलेल्या अहवालानंतर पेशावरचे उपायुक्त मोहम्मद अली असगर यांनी दोन्ही घरांची किंमत निश्चित केली आहे.

त्यासोबत, पुरातत्व विभागाकडून औपचारिक अपिल देखील केली गेली आहे. या दोन्ही घरांच्या खरेदीसाठी प्रांतीय सरकारला दोन कोटी रुपये देण्यास सांगण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. कारण ही दोन्ही घरं अनेकवेळा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घरांना तोडून तिथे व्यावसायिक प्लाझा बांधण्याची योजना होती. पण प्रत्येकवेळी पुरातत्व विभागाने या दोन्ही घरांचे संरक्षण केले आहे.

दरम्यान, राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घराची निर्मिती १९१८ ते १९२२च्या दरम्यान झाली आहे. पेशावरच्या किस्सा खवानी बाजारात हे घर आहे. हे घर राज कपूर यांचे आजोबा दीवान बासेश्वरनाथ कपूर यांनी उभारले होते. राज कपूर यांनी त्यांचे बालपण याच घरात घालवले आहे. तर ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे १०० वर्ष जुन घरही याच भागात आहे. २०१४ मध्ये नवाज शरीफ यांच्या सरकारने हे घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते.