२०१२ साली घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता. मात्र आज (शुक्रवारी) २० मार्च २०२० रोजी निर्भयाला न्याय मिळाला. तिच्यावर अन्याय करणाऱ्या चारही दोषींना फाशीची शिक्षा झाली. त्यामुळे देशभरात आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण त्यांच्या भावना व्यक्त करत आहे. मात्र या साऱ्यात अभिनेत्री प्रिती झिंटाने मात्र न्यायव्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. निर्भयाला न्याय मिळवून द्यायला इतका वेळ का लागला असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे.

“निर्भयाच्या दोषींना जर २०१२ मध्येच फाशी दिली असती, तर महिलांवर होणारे अत्याचार तेव्हाच कमी झाले असते. न्यायव्यवस्थेने तशा तरतुदी केल्या असत्या. लोकांच्या मनात कायद्याचा धाक असला पाहिजे. नंतर उपाय करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली चांगली. न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची हीच योग्य वेळ आहे”, असं ट्विट प्रितीने केलं आहे. तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली आहे.

पुढे ती म्हणते, “शेवटी निर्भयाला न्याय मिळाला. पण मला एका गोष्टीची आशा आहे की, निदान यापुढे तरी अशा खटल्यांचे निकाल लवकर लागतील. पण या निर्णयामुळे मी खूश आहे. निदान आता तरी तिच्या आई-वडिलांना न्याय मिळाला”.

वाचा : Coronavirus : करोनाचा धोका असूनही राधिका गेली लंडनला; सांगितला विमानतळावरचा अनुभव

दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं होती.