21 January 2019

News Flash

लक्ष्मीकांत आणि अभिनयचा वाढदिवस एकाच दिवशी नसतो; प्रिया बेर्डेंचा खुलासा

विकिपिडीयावरही लक्ष्मीकांत आणि अभिनयच्या वाढदिवसाची तारीख एकच दिल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झालेला.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनय बेर्डे

आजच्या युगात आपण इंटरनेटवर किती अवलंबून आहोत ना.. काहीही माहिती हवी असली की गुगल आहे ना.. गुगल कधी चुकूच शकत नाही अशी आपली काहीशी धारणा असते. त्यामुळे अगदी डोळे बंद करून आपण गुगलने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवतो. पण ही माहिती कधी कधी चुकीचीही असू शकते हे आता समोर आले आहे.

मराठी सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली खास ओळख निर्माण केली. आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगमुळे त्यांनी मराठी सिनेमातच नव्हे तर हिंदी सिनेमांमध्येही यश मिळविले. मराठी चित्रपटसृष्टीत विनोदाचा बादशहा म्हणून त्यांची ओळख होती. नुकताच ३ नोव्हेंबरला त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे याचा वाढदिवस झाला. विशेष म्हणजे याच दिवशी लक्ष्मीकांत यांचाही वाढदिवस असतो अशी वदंता समाज माध्यमांवर पसरली होती. विकिपिडीयावरही लक्ष्मीकांत आणि अभिनय यांच्या वाढदिवसाची तारीख एकच दिल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झालेला. पण, लक्ष्मीकांत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा वाढदिवस ३ नोव्हेंबरला नसून २६ ऑक्टोबरला असल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टवरून सांगितले.

लक्ष्मीकांत आणि प्रिया यांचा मुलगा अभिनय याचा वाढदिवस ३ नोव्हेंबरला असतो ही माहिती बरोबर आहे. पण, त्याच दिवशी लक्ष्मीकांत यांचाही वाढदिवस असतो ही माहिती चुकीची असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले आहे. प्रिया बेर्डे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, काल पासून फेसबुकवर व इतर सोशल मिडियावर , लक्ष्मीकांत बेर्डे यांचा वाढदिवस साजरा केला गेला…. गेली ३,४ वर्ष मी हा मनस्ताप सहन करतेय दरवर्षी मी सांगतेय की बेर्डे यांचा जन्म दिवस ३ नोव्हेंबर नाही तर २६ ऑक्टोबर आहे. पण किती ही सांगितलं तरी तिच चूक दरवर्षी करतात. ३ नोव्हेंबरला माझ्या मुलाचा अभिनय बेर्डेचा वाढदिवस असतो. विकिपीडियावर जी काही माहिती उपलब्ध आहे. त्यात बऱ्याच चुका पण आहेत. असो तर माझ्या मित्र मैत्रिणींनिनो तुम्हाला नम्र विंनंती आहे की कुठलीही खातरजमा केल्या शिवाय पोस्ट टाकू नये. धन्यवाद.

प्रिया बेर्डे यांच्या पोस्टनंतर आता अनेकांना लक्ष्मीकांत यांची योग्य जन्मतारीख कळलीच असेल.

First Published on November 5, 2016 11:50 am

Web Title: priya berde clarified laxmikant and abhinay berdes birth date misunderstanding