झटपट प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळवण्यासाठी समाजमाध्यमांचा खुबीने वापर करणारे अनेक तरुण आहेत. इंटरनेटवरील व्हायरल चित्रफितीत भुवया उडवणारी प्रिया वारियार हिचे समाजमाध्यमांवर काहीच दिवसांत लाखो चाहते तयार झाले. प्रियासारखे असे अनेक इंटरनेट सेन्सेशन आहेत ज्यांच्या चित्रफिती, छायाचित्रे काही क्षणांत व्हायरल झाली आणि त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. पण ही झटपट प्रसिद्धी किती दिवस टिकली, हा प्रश्नच आहे. यातले अनेक चेहरे लवकरच विस्मृतीत गेले तर काही प्रसिद्धीच्या या लाटेवर स्वार होऊन कुठे ना कुठे तरी स्थिरावले..

‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळी चित्रपटातील प्रिया वारियार आणि रोशन अब्दुल हे दोघे इंटरनेटवर त्यांच्या व्हायरल चित्रफितीतून धुमाकूळ घालत आहेत. शाळेच्या गणवेषात असणाऱ्या या दोघांचं किशोरवयीन प्रेम, ते व्यक्त करण्याची ‘धाडसी आणि मजेशीर’ पद्धत अनेकांना भुरळ पाडतेय. प्रियाचं भुवया उडवणं, डोळा मारणं त्याला रोशनचा प्रतिसाद यामुळे शाळेतलं अव्यक्त प्रेम अनेकांना पुन्हा आठवतंय. शाळेत मुलीशी बोलणं दूरच निव्वळ बघण्याचीही हिंमत न केलेली एक पिढी आहे. त्याउलट थेट मुलाला पाहून इशारे करणारी, प्रतिसाद देणारी प्रिया तरुणांना आवडते आहे. प्रियाचे एका दिवसात समाजमाध्यमावर ६०८ हजार फॉलोअर्स तयार झाले, आतापर्यंत तिचे इन्स्टाग्रामवर १८७ हजार फॉलोअर्स आहेत. सनी लिओनीलाही मागे टाकत गुगलवर सर्वात जास्त शोधल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींपैकी ती एक ठरली आहे. अनेकांनी तिचे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेट्स, डीपीही ठेवले आहेत. प्रिया आता एका वादातही सापडली असून तिच्या गाण्यातील काही शब्दांमुळे भावना दुखावल्याने काही मुस्लीम संघटनांनी तक्रारीही दाखल केल्या आहेत. प्रियाची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर काही काळाने तिला या वादाचा सामना करावा लागला आहे. मात्र या सगळ्याचा तिला कारकीर्दीत पुढे जाण्यासाठी उपयोग होईल का? आणि कसा हे अजून सिद्ध व्हायचं आहे. प्रियासारखे असे अनेक चेहरे याआधी समाजमाध्यमांनी दिले आहेत. प्रियाच्या गाण्यावरून आणि तिच्या हरकती पाहता आपल्यासमोर तसाच एक हटकून समोर येणारा चेहरा म्हणजे आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा. ‘सैराट’मधील तिच्या बेधडक आर्ची या व्यक्तिरेखेने तिला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. अर्थात अजूनही शिक्षण घेत असलेल्या रिंकूने तात्पुरते का होईना ही प्रसिद्धी बाजूला सारून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आहे. पण ती निवडक चित्रपटांत काम करत असल्याने ही प्रसिद्धी तिच्या पथ्यावर पडली आहे असे म्हणता येईल. मात्र असे यश प्रत्येकाच्याच वाटय़ाला येते असे नाही.

आपल्या गाण्यामुळे सुरुवातीपासूनच ‘ढिंचँक पूजा’ ही आणखी एक इंटरनेट सेलिब्रिटी सतत वादात असायची. स्वॅग वाली टोपी, दारू, सेल्फी मेने लेली अशी अनेक गाणी तिने लिहिली व गायली आहेत. यूटय़ूबवर तिच्या गाण्यांना लाखो हिट्स मिळाल्या आहेत. ‘दिलो का शूटर’ या तिच्या गाण्यामुळे ती जास्त चर्चेत आली. यमक जुळवून आचरट गाणी तयार करणारी ही ढिंचँक पूजा समाजमाध्यमांवर टिकेचा विषयही झाली होती. तिचं मूळ नाव पूजा जैन आहे. ती उत्तर प्रदेशमध्ये राहते. नुकत्याच संपलेल्या ‘बिग बॉस सीझन ११’ मध्येही ती सहभागी झाली होती.

‘एअरटेल फोरजी’च्या जाहिरातींमधून घराघरात पोहचलेली ‘एअरटेल गर्ल’ म्हणजेच साशा चेट्टरी. तिच्या आखूड केसांमुळे आणि टॉम बॉय लुकमुळे ती कधीही मॉडेल वाटली नाही, पण ती मॉडेल आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे तीही समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली होती. तिचेही समाजमाध्यमांवर चाहते आहेत. एअरटेलच्या जाहिरातीत झळकण्यापूर्वी साशा एका जाहिरात कंपनीत कॉपीरायटर म्हणून काम करायची. त्यानंतर साशा कुठेच दिसली नाही. साशाला स्वत:चा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित करण्याची इच्छा आहे, पण या व्हिडीओची अद्यापही नेटकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

‘पाकिस्तानी चायवाला’ हा एकेकाळी तरुणींच्या आवडीचा विषय होता. अर्शद खान हा १८ वर्षांचा चहा विकणारा तरुण त्याच्या रुबाबदार आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे अनेक तरुणींच्या चर्चेचा विषय झाला होता. झावेरिया अली या महिला छायाचित्रकाराने पाकिस्तानमधील एका वृत्तपत्रात त्याचे छायाचित्र छापले. ते समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. अनेक तरुणींनी इंटरनेटवर या चहावाल्याचा शोध घेतला. त्याची छायाचित्रे पोस्ट केली. काही दिवसांनंतर त्याला चक्क मॉडेलिंगच्या ऑफर्स आल्या आणि हा चहावाला मॉडेल झाला. समाजमाध्यमांवर होणारी प्रसिद्धी एका चहावाल्याला किती लोकप्रिय करू शकते हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं.

हिरो अलोम या टोपण नावाने ओळखला जाणारा बांगलादेशी अभिनेता अनेक नेटिझन्सच्या विनोदाचा विषय होता. त्याचे इंटरनेट मेमे अर्थात काही विनोदी वाक्यांसह तयार केलेली छायाचित्रे, चित्रफीत व्हायरल झाल्या आहेत. बारीक शरीरयष्टी असलेला हिरो अलोम हा कुणी आकर्षक दिसणारा अभिनेता नाही. पण त्याच्या यूटय़ूब चॅनलला ४.८ दशलक्ष प्रेक्षक मिळाले आहेत.

पाकिस्तानमधील गायक, संगीतकार ताहेर शहा हाही कमीत कमी वेळात नावारूपाला आलेला इंटरनेट सेलेब्रिटी म्हणून ओळखला जातो. चित्रविचित्र पोषाखातील ‘मॅनकाइंड एंजल’ ही त्याची संगीत चित्रफीत प्रदर्शित झाल्यानंतर तो ट्विटरवर ट्रेंडिंग होणारा विषय होता. पाकिस्तान, भारत आणि अमेरिकेतही त्याचे फॉलोअर्स आहेत. त्याच्या चित्रफीतीला यूटय़ूबवर १.२ दशलक्ष हिट्स मिळाल्या आहेत.

‘रईस’च्या प्रसिद्धीसाठी पुण्याला गेलेल्या शाहरुखने ट्विटरवर एक सेल्फी अपलोड केला. त्या व्हिडीओत दिसणाऱ्या शाहरुखला सोडून एका सुंदर मुलीकडे ट्विटरवासीयांचे लक्ष गेले. त्या तरुणीचे नाव सायमा हुसेन मीर असे आहे. या सेल्फीनंतर सायमाला समाजमाध्यमांवर ट्रोल करण्यात आले. वैतागलेल्या सायमाने तेव्हा तिचे अकाऊंटच काढून टाकले होते. सध्या ती इन्स्टाग्रामवर असून तिचे आठ हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. समाजमाध्यमांवरून अनेकदा योग्यता नसतानाही केवळ एका काही करामतीमुळे असे अनेक चेहरे दररोज नावारूपाला येतात आणि जातात. काहींचे चेहरे, नाव लोकांच्या काही काळ लक्षात राहतेही मात्र ही प्रसिद्धी फार काळ टिकणारी नाही. अर्थात, मिथिला पालकर, प्राजक्ता कोळी असे काही कलाकार याच समाजमाध्यमांमुळे नावारूपाला आले आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीला योग्य ती दिशाही दिली. पण अजूनही या समाजमाध्यमांचा योग्य तो वापर करत आपापल्या क्षेत्रात पुढे जाण्यापेक्षा काही विचित्र करामती करत क्षणिक प्रसिद्धीत रमणाऱ्यांचेच प्रमाण अजूनही जास्त असल्याचे या प्रिया प्रकरणावरून अधोरेखित झाले आहे.