‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियरविरोधात हैदराबाद आणि औरंगाबादमध्ये तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर प्रियाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत त्वरित सुनावणी करण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देत प्रियाला दिलासा दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे प्रियाने आभार मानले आहेत. ‘करिअरच्या सुरूवातीलाच तुमच्यावर खटले दाखल झाले तर फार घाबरायला होते. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मी सुखावले आहे. यानिमित्ताने माझ्या पाठी भक्कमपणे उभे राहिलेल्या माझ्या चाहत्यांचे मी आभार मानू इच्छिते,’ असे प्रिया म्हणाली.

काही दिवसांपूर्वी प्रियाविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व खटल्यांवर स्थगिती आणत पुढील सुनावणी होईपर्यंत तिच्याविरोधात कोणतीच फौजदारी कारवाई करण्यात येणार नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तेव्हा आता यापुढील सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय देईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

https://www.instagram.com/p/BfdMfvmD4NX/

‘मानिक्य मलरया पूरवी’ या व्हायरल गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया आणि तिच्या आगामी ‘उरू अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटाच्या निर्माते, दिग्दर्शकांविरोधात तेलंगणा आणि महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या या गाण्यावर आक्षेप घेत एका विद्यार्थ्याने हैदराबादमध्ये दिग्दर्शक ओमर लूलूविरोधात सर्वप्रथम तक्रार दाखल केली होती. या गाण्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले होते.

‘मानिक्य मलरया पूवी’ हे गाणे फार वर्षांपूर्वी लिहिण्यात आले होते. पारंपरिक मुस्लिम गाणे म्हणून ते गाणे ओळखले जायचे. मोहम्मद पैगंबर यांची पहिली पत्नी खदीजा बिंत ख्वालिद यांच्या स्वभावगुणांचं वर्णन या गाण्यात केलं आहे. पण, भाषांतराच्या दृष्टीने पाहिले असता गुगल ट्रान्सलेटरवर मात्र मोहम्मद पैगंबर यांच्या पत्नीविषयी काही चुकीची माहिती समोर येत असल्यामुळेच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले होते.