प्रिया वरियर हे नाव आता सोशल मीडियाला नवीन नाही. मल्याळम अभिनेत्री प्रियाच्याच नावाची चर्चा सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. तिची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली. एका दिवसात इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोवर्स मिळवणारी प्रिया ही जगातील तिसरी सेलिब्रिटी झाली आहे. या मल्याळम अभिनेत्रीची दखल आता अमुलनेही घेतली. अमुल कंपनी नेहमीच चालू घडामोडींवर भाष्य करताना  दिसते. सध्या देशात मोदींपेक्षाही कोणाची चर्चा होत असेल तर ती प्रिया वरियर आहे. त्यामुळेच अमुलने प्रियाच्या मादक अदांचे कार्टून रेखाटले आहे. ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’ या इंग्रजी कवितेची मदत घेत ‘विंक ऑल, विंक ऑल लिटिल स्टार’ असे कॅप्शन दिले. या कार्टुनमध्ये अमुल गर्ल प्रिया वरियरप्रमाणेच डोळा मारताना दिसत आहे.

प्रियामुळे ‘उरू अदार लव्ह’ या सिनेमातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) हे गाणंही प्रकाशझोतात आलं. या सिनेमाचे काही भागांचे चित्रीकरण होणे बाकी असले तरी सिनेमाच्या प्रदर्शनाकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. एका आठवड्यात हा गाण्याच्या व्हिडिओ आतापर्यंत २५ लाखांहून अधिक पाहिला गेला. तर प्रियाच्या व्हेरिफाइ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ १० लाखवेळा पाहण्यात आला आहे. वघ्या काही क्षणांसाठी तिची झलक पाहून अनेकांनीच तिच्यावर आपलं प्रेम असल्याचं जाहीरही केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा उल्लेख ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही केला जातोय. चाहत्यांनी तिच्यावर केलेल्या या जिवापाड प्रेमासाठी प्रियाने त्यांचे आभारही मानले आहेत. ओमर लुलु दिग्दर्शित ‘उरू अदार लव्ह’ हा सिनेमा येत्या ३ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/Be-0hR9jBqT/

काही दिवसांपूर्वी, आपल्या खाजगी आयुष्याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियाने तिचे मुंबई कनेक्शनही सांगितले. प्रियाचा जन्म केरळमध्ये झाला असला तरी बालपणीचा काळ तिचा मुंबईत गेला आहे. तिचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले आहे. प्रियाचे वडील प्रकाश वरियर सेंट्रल एक्साइज डिपार्टमेण्टमध्ये काम करतात. मुंबईत काही वर्ष नोकरी केल्यानंतर प्रकाश यांनी केरळमध्ये बदली करुन घेतली. सध्या ती वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. प्रिया आई- बाबा, छोटा भाऊ आणि आजी- आजोबा अशा माणसांनी भरलेल्या घरात राहते.