प्रियदर्शन जाधव – response.lokprabha@expressindia.com , @prizadhavv

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉक एका मुलाखतीत असं म्हणाला होता की, जेवढी कम्युनिकेशनची साधनं वाढतील तेवढी गुन्हेगारी वाढेल. रक्ताचा एक थेंब सांडला नाही तरीही ते गुन्हे तेवढेच गंभीर असतील. हिचकॉकच्या या वाक्याची प्रचीती आज आपल्याला पावलोपावली येते. माणसामाणसांत संवाद होण्यासाठी मोबाइल आला; परंतु त्यातला कॅमेरा कधी आपल्यावर आरूढ झाला आणि त्यातून काय भयंकर गोष्टी आपल्या समोर आल्या ते रोज दिसतंच आहे.

‘बिग बॉस’चे सीझन टीव्हीवर गाजू लागले. स्टिंग ऑपरेशन्समध्ये स्पाय कॅमचा वापर पूर्वीपासून होताच. सतत २४ तास रस्त्यावर, सोसायटीत, मॉलमध्ये, ऑफिसमध्ये, बागेत, दुकानात… तुम्ही जाल तिकडे आता कॅमेरा असतो. तो सतत तुमच्यावर नजर ठेवून असतो. याचा परिणाम म्हणजे मोबाइलवर, यू टय़ूबवर, एमएमएस स्कॅन्डल दिसू लागले. कुणीतरी, कुणाला तरी आपल्या कॅमेऱ्यात टिपतंय आणि त्याचा भलाबुरा वापर केला जातोय. आता हा कॅमेरा तुमच्या नकळत हळूच तुमच्या घरात शिरलाय आणि तुम्ही त्याला टाळू शकत नाही.

पसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी त्याच कॅमेऱ्याशी निगडित आहेत. त्यांच्या हव्यासापोटी अनेकांनी अत्यंत खालच्या थराला जाणे पत्करले. प्रसंगी त्याला त्यांनी मनोरंजनाचं लेबल लावलं आणि बाजारात विकलं. यातून एक गोष्ट सतत जाणवत राहिली की, आता आपण सगळेच आपलं दु:ख साजरं करायच्या मागे आहोत. परवा एका माणसाने आपले वडील वारले हे जगाला कळण्यासाठी वडिलांच्या पार्थिवासकट ‘सेल्फी’ काढला आणि फेसबुकवर टाकला. हा कॅमेरा आपल्याला इतका ‘सेल्फिश’ बनवेल असं वाटलंही नव्हतं. कॅमेऱ्याचा वापर करून ब्लॅकमेल केल्याच्या तर हजारो घटना घडतायेत. इतकंच काय, आता वाघाने माणसाला कसं मारलं हे शूट करण्यात आपल्याला रस आहे, माणूस वाचवण्यात नाही. भर रस्त्यात एका बाईला बेदम मारहाण करण्यात येते, लोकांना या घटनेचं व्हिडीओ शूटिंग करायची शुद्ध असते, पण तिला वाचवण्याचं भान नसतं. ट्विटरवर एका मुलीने स्वत:चा नग्न फोटो काढला आणि स्वत:च्या कौमार्याची बोली लावली. आठ हजार अमेरिकन डॉलरवर बोली थांबली. हे सगळं कुठे चाललंय? आल्फ्रेड हिचकॉकला निश्चितपणे फारच पुढचं दिसलं होतं.

२०१३-१४ मध्ये मी ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’ नाटक केलं तेव्हा ते लगेच तीन-चार वर्षांत सत्यात उतरेल आणि आपल्या आसपास असं घडताना दिसेल असं कधीच वाटलं नव्हतं. या नाटकात एक नट स्वत:च्या आयुष्याचा रिअ‍ॅलिटी शो करतो. आपल्या बायकोला व्हच्र्युअली टीव्हीवर विकतो. अर्थात हे रंगमंचावर उतरवणं सोपं नव्हतं. नटांसाठी तर हे मोठंच आव्हान होतं. नाटकात काम करायचंय, पण सेटमध्ये असलेल्या कॅमेऱ्यांना समजून घेऊन ही सोपी गोष्ट नव्हती. चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकरने अत्यंत कष्टाने ते साधलं. रंगभूमीवर पहिल्यांदाच नाटकाच्या सेटवर लाइव्ह फुटेज देणारे कॅमेरे आले. नाटक चालू असताना त्याचं फुटेज दाखवायला चार एल.ई.डी. स्क्रीन आल्या. ब्लॅक आऊटमध्ये पुन्हा शूट केलेलं फुटेज दाखवायचं, त्यामुळे नाटकाचा तांत्रिक डोलारा आणि आíथक पसारा वाढतच होता. व्यावसायिक नाटकाला लागतात तशा कुठल्याच गोष्टी नाटकात नव्हत्या तरीही हे नाटक लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून निर्माते अभिजित साटम आणि ऋजुता चव्हाण यांनी नाटकात प्रचंड पसा आणि जीव ओतला. नाटक चालेल की नाही याची कुणालाच शाश्वती नसते, पण अपेक्षेपेक्षा खूपच चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळाला. २०० व्या प्रयोगापर्यंत हे नाटक आलं ते नाटकातल्या अभिनेत्यांमुळे, निर्मात्यांच्या अफाट इच्छाशक्तीमुळे आणि अर्थात रसिक, जाणकार प्रेक्षकांमुळे!
सौजन्य – लोकप्रभा