बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आता ‘ग्लोबल स्टार’ झाली आहे. ‘क्वांटिको’सारखी मालिका आणि ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटातून ती जगभरात पोहोचली. ‘बर्फी’, ‘दिल धडकने दो’, ‘ऐतराज’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारखे अनेक हिट चित्रपट प्रियांकानं दिले. मात्र प्रियांकाची सुरूवात टॉलिवूड चित्रपटापासून झाली हे क्वचितच कोणाला माहिती असेल.

‘थामिझान’ हा प्रियांकाचा पहिला तामिळ चित्रपट होता. २००० साली प्रियांकानं मिस वर्ल्डचा किताब पटकावला. त्यानंतर दोन वर्षांनी तिनं ‘थमिझान’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तामिळमधला प्रसिद्ध अभिनेता विजय चंद्रशेखर याच्यासोबत तिनं या चित्रपटात काम केलं होतं. खरंतर या चित्रपटाआधी ‘हमराज’ हा चित्रपट तिच्या वाट्याला आला होता. बॉबी देओल, अक्षय खन्ना यांची प्रमुख या चित्रपटात होती. मात्र काही कारणामुळे प्रियांकाला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे प्रियांकाऐवजी अमिशा पटेलनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली.

‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सनी देओल, प्रिटी झिंटा यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. या चित्रपटानंतर प्रियांकानं करिअरमध्ये अनेक चढ उतार पाहिले. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळले, तर काही चित्रपटांनी मात्र तिला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलं. ‘बर्फी’, ‘सात खून माफ’, यासांरख्या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी चित्रपट समिक्षकांकडूनही तिला खूप प्रशंसा मिळाली. रुपेरी पडद्यावर प्रियांकानं खलनायिकाही रंगवली. अभिनयाव्यतिरिक्त संगीत क्षेत्रातही तिनं छाप उमटवली आहे.