टेलिव्हिजन विश्वात ‘बिग बॉस’ आणि वाद हे शब्द आता समानार्थी झाले आहते, असे म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाच्या ११ व्या पर्वाला सुरुवात झाली असून पहिल्या दोन आठवड्यांत ‘बिग बॉस’च्या घरात बऱ्याच घडामोडी घडल्याचं पाहायला मिळतंय. जुबैर खान आणि सलमान खानमध्ये झालेल्या वादापासून ते या घरात होणाऱ्या कॅटफाइटपर्यंत सर्व काही प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहे.
अशा या ‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात आता आणखी एका सदस्याचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे सध्या अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. कारण हा बदलही तसा अनपेक्षितच आहे. येत्या काही दिवसांमध्ये ‘सेल्फी साँग’ फेम यु-ट्यूबर ढिंच्यॅक पूजा ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेला ‘स्प्लिट्सव्हिला’ फेम प्रियांक शर्मा आणि ढिंच्याक पूजा या कार्यक्रमात ‘वाईल्ड कार्ड’ एण्ट्रीच्या रुपात परतणार आहेत. तेव्हा पूजाच्या येण्याने आता या घरातील गणितं बदलणार का हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे. या उत्सुकतेसोबतच ‘बिग बॉस’च्या घरात पूजाची ढिंच्याक गाणी कितपत गाजणार, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. पूजाच्या गाण्यांविषयी सांगावं तर, ‘स्वॅग वाली टोपी’ आणि ‘दारु इन हर किटी’ ही गाणीही भन्नाट गाजली आहेत.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

ट्विटर आणि फेसबुकवरही तिच्या गाण्यांना मोठी पसंती मिळत असून यामुळे तिच्या अर्थिक उत्पन्नात मोठी भर पडत आहे. काही दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध वेबसाइटने तिच्या उत्पन्नाचा अहवाल सादर केला होता. पूजाचं एकंदर उत्पन्न पाहता बिग बॉसच्या घरात येण्यासाठी तिला किती मानधन मिळालं आहे याविषयीसुद्धा प्रेक्षकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे.