अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी नुकतंच जोधपूरमधील उमेद भवन येथे डेस्टिनेशन वेडींग केलं. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये निक प्रियांकाने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. लग्नात कमी पाहुण्यांना आमंत्रित केल्यामुळे ही जोडी मुंबई आणि दिल्लीमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटी आणि अन्य मित्रपरिवाराला रिसेप्शन पार्टी देणार आहेत. त्यामुळे निक प्रियांका मुंबईला रवाना झाले असून लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी प्रसारमाध्यमांसमोर आली आहे.

निक प्रियांकाने लग्नातील कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये याकडे विशेष लक्ष दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नातील फोटोदेखील चाहत्यांना पाहता आले नव्हते. या कारणास्तव या लग्नातील फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. असं असतानाच जोधपूर विमानतळावर या जोडीची लग्नानंतरची पहिली झलक समोर आली आहे.

जोधपूर विमानतळावर या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. यावेळी प्रियांकाने हातात लाल चुडा, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर सिंदूर लावल्याचं पाहायला मिळालं. तर निकसुध्दा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ब्राऊन जॅकेटमध्ये दिसला. विशेष म्हणजे लग्नानंतर ही जोडी प्रथमच चाहत्यांच्या दृष्टीस पडल्यामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.

दरम्यान, निक -प्रियांकाने १ डिसेंबर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. तर २ डिसेंबर पारंपारिक हिंदू पद्धतीने. या सोहळ्याला केवळ ८० पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं.त्यामुळे लग्नाची पत्रिकादेखील छापण्यात आल्या नव्हत्या. मात्र मुंबईमध्ये परतल्यानंतर निक-प्रियांका लवकरच रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत.