‘दंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी तिच्या निर्णयाचा सन्मान केला तर काहींनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. यावर आता शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट केले की, ‘तुझी श्रद्धा असेल तर तू तुझ्या आस्थेचं पालन करू शकते. पण तुझ्या करिअरचा निर्णय तू धर्माशी जोडू नको. तुझं हे पाऊल तुझ्या धर्माला असहिष्णू ठरवतं, मात्र प्रत्यक्षात तसं नाहीये. इस्लाममध्ये सहिष्णुतेला जागा नाही, या चुकीच्या धारणेला हा निर्णय आणखी दुजोरा देतो.’ अभिनय क्षेत्र हे तिच्या आस्थेचं पालन करण्यामध्ये अडथळा आणते हे ऐकणं दुर्दैवी आहे, असंही त्या म्हणाल्या.

झायराने रविवारी (३० जून) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या सहा पानांच्या मोठ्या पत्रात सिनेसृष्टी सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली. ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. अल्लाहच्या रस्त्यावरून मी भरकटले आहे,’ असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. झायराने हा निर्णय दबावाखाली येऊन घेतला असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.