एवढय़ा छोटय़ा कारकीर्दीत दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या कंगना राणावतच्या अभिनयाबद्दल कोणालाच शंका घेण्याचे कारण नाही. मात्र, कंगना तिच्या फ टकळ बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहे आणि कधी कधी त्याचा फटकाही तिला पडतो. अगदी पुरस्कार जाहीर झाल्यावरही तिच्यावर आपल्या बोलण्यामुळे फटफजितीची पाळी आली आहे. कंगनाला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिचे तोंडभरून कौतुक केले होते. स्वत: स्पर्धेत असूनही प्रियांकाने तिची स्तुती करताना कुठेही कसर ठेवली नाही. मात्र, याची कुठलीच कल्पना नसलेली कंगना ‘प्रियांकाला मिळालेले सगळे पुरस्कार माझे होते’, असे उद्गारती झाली.

प्रियांका चोप्राला ‘मेरी कोम’साठी जवळपास सगळ्याच चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमधून सवरेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाले; पण राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा कंगनाला मिळाल्याचे जाहीर झाले तेव्हा प्रियांकाने तिचे अभिनंदन तर केलेच, शिवाय तिचे जाहीर कौतुकही केले. कंगना तेव्हा दिल्लीत ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याने तिच्यापर्यंत प्रियांकाच्या या स्तुतीतला एकही शब्द पोहोचला नव्हता. पुरस्काराचे वृत्त कळल्यानंतर कंगना माध्यमांसमोर ‘प्रियांकाला मिळालेले सगळे पुरस्कार माझे होते,’ असे बोलून मोकळी झाली. इंडस्ट्रीतील पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिला पुरस्कार न देता प्रियांकाला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा मान मिळाला याबद्दल तिच्या मनातली खदखद तिने व्यक्त केली. जेव्हा तिला प्रियांकाच्या या वागण्याचा पत्ता लागला तेव्हा ती चांगलीच पस्तावली आणि तिने ताबडतोब प्रियांकाला फोन करून झाल्या गोष्टींची सारवासारव केली.
माध्यमांनी नेहमीप्रमाणे माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे कारण देत तिने कॅलिफोर्नियात असलेल्या प्रियांकाशी गप्पा मारून आपले संबंध सुरक्षित ठेवण्याची धडपड केली. प्रियांकानेही ही गोष्ट हसण्यावारी नेली असल्याचे तिनेच सांगितले. याआधीही दीपिकाने तिला मिळालेला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा कंगनाला मिळायला हवा होता, असे सांगून तो पुरस्कार तिला समर्पित केला होता. मात्र, कंगनाने तिचीही खिल्ली उडवली होती. प्रियांकाच्या बाबतीत तिने सावध पवित्रा घेतला आहे. इतर कोणत्याही अभिनेत्रींपेक्षा प्रियांका मला जास्त चांगली ओळखते. एवढे सगळे झाल्यानंतरही आमच्यातले संबंध पहिल्यासारखेच आहेत यावरून हेच सिद्ध होते, अशी उलट गोड शब्दांची पखरण करत तिने तात्पुरते का होईना आपली चूकभूल सुधारली आहे. मात्र, आपल्या फटकळ वक्तव्यांनी पुन:पुन्हा अशी चूक करणे कंगनाला परवडणारे नाही.