गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित-नेने, प्रियांका चोप्रा आणि लेखक-दिग्दर्शक श्री राव यांचे एकत्रित छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल झाले आणि चर्चेला एकच उधाण आले होते. माधुरी आणि प्रियांका चोप्रा या दोघीही हॉलीवूडच्या या शोसाठी निर्मात्या म्हणून एकत्र आल्या आहेत, अशी कुजबूजही सुरू झाली होती. या शोची उडती खबर खरी असून आपल्याच आयुष्याचा पट मांडणाऱ्या शोची सहनिर्माती म्हणून आपण नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असल्याची कबूली खुद्द माधुरीने दिली आहे.

माधुरी अमेरिकेत वास्तव्यास असतानाचे तिचे आयुष्य कसे होते, याचे चित्रण या मालिकेतून करण्यात येणार असून प्रियांका चोप्राची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘क्वाँटिको’ या शोचे निर्माते मार्क गॉर्डन प्रॉडक्शनच्या वतीने या शोची निर्मिती करण्यात येणार आहे. जूनमध्ये माधुरी सहकुटुंब पुन्हा एकदा सुट्टीसाठी म्हणून अमेरिकेत रवाना झाली होती. तिची ही महिन्याभराची सुट्टी या शोच्या निर्मितीसाठी कारणी लावण्याचा प्रयत्न केला जात होता, हे आता उघड झाले आहे. गेले वर्षभर या शोवर काम सुरू होते. मात्र जूनपासून आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने हा शो आकाराला आला असल्याची माहिती शोशी संबंधित सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा दिग्दर्शक-लेखक श्री. राव यांनी माझी भेट घेतली. आणि तुझ्या अमेरिकेतील वास्तव्यावरून प्रेरित असलेला शो करायचा आहे, असं सांगितलं तेव्हा मला आनंदाचा धक्का बसला होता, असं माधुरीने सांगितलं. त्याच वेळी मी आणि माझे पती श्रीराम नेने यांनी श्रीशी चर्चा केली. या चर्चेतूनच शोची कथा आकाराला आली. त्यानंतर मार्क गॉर्डन प्रॉडक्शनने शोच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आणि ‘एबीसी नेटवर्क’ शो प्रक्षेपण करणार हे निश्चित झाले. प्रियांकाचे या शोची कार्यकारी निर्माती म्हणून येणे ही आणखी एक आनंदाची बाब ठरली आहे. कारण स्वत: प्रियांका अमेरिकेत वास्तव्य करून असल्याने तिलाही आता इथली चांगली माहिती आहे, असेही माधुरीने सांगितले. बॉलीवूडच्या या दोन आघाडीच्या अभिनेत्री नेमक्या कोणत्या कारणासाठी एकत्र येतायेत, याबद्दल आता सगळ्यांना माहिती झाले असले तरी हा शो कसा असेल, याचीही उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये आहे.