‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिचं निक जोनाससोबतच तथाकथीत प्रेमप्रकरण आता वेगळंच वळण घेताना दिसत आहेत. कारण इतके दिवस केवळ अफवा म्हणून चर्चेत असलेलं हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलं आहे. काही दिवसांपूर्वी निक प्रियांकासोबत भारतात येणार अशा चर्चांना पेव फुटलं होतं, पण आता या अफवा प्रत्यक्षात उतरल्या आहेत. गुरूवारी रात्री उशिरा निक प्रियांकासोबत भारतात आला आहे. क्वांटिकोचं चित्रिकरण संपल्यानंतर प्रियांका मुंबईत परतणार होती, पण आता तिच्यासोबत निकही आला आहे. निक प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना भेटण्यासाठी भारतात आल्याचं समजत आहे.

काही दिवसांपूर्वीच निकनं भारतात येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. या गोष्टीला एक आठवडा उलटत नाही तोच निक गुरूवारी रात्री प्रियांकासोबत मुंबई विमानतळावर दिसला. अमेरिकेत खुलेपणानं वावरणारं हे जोडपं मात्र यावेळी कोण्याच्याही नजरेस पडणार नाही अशा पद्धतीनं विमानतळावरून प्रियांकाच्या घरी रवाना झालं. भारतीय माध्यमांच्या नजरेस निकचा चेहरा दिसणार नाही याची पुरेपुर काळजी प्रियांकानं घेतली होती. काही दिवसांपूर्वी प्रियांकानं निकच्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचं निमित्त साधून निकनं प्रियांकाची भेट कुटुंबियांशी घालून दिली होती. आता या गोष्टीला एक महिनाही उलटत नाही तोच प्रियांकाच्या आईला भेटण्यासाठी निक भारतात आला आहे. त्यामुळे या दोघांचं नातं केवळ अफवा नसून दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचं समजत आहे.

निकनं प्रियांकाला लिव्ह इनमध्ये राहण्याबद्दलही विचारलं होतं. प्रियांका आणि निकनं आपल्या नात्याची कबुली अजूनही चाहत्यांना दिली नाही, मात्र निकचं प्रियांकावर खूपच प्रेम असल्याचा दावा निकच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीनं एका मुलाखतीत केला होता. आता निक भारतात आला आहे, त्यामुळे हे दोघंही आपल्या नात्याची कबुली चाहत्यांकडे देतात का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.