वॉल्ड डिझ्नीच्या ‘द लायन किंग’, ‘मॅलेफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ इविल’, ‘जंगलबूक’ या सारख्या अनेक हॉलिवूड चित्रपटांना बॉलिवूड कलाकारांनी आवाज दिला आहे. आता लवकरच वॉल्ड डिझ्नीचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटालादेखील बॉलिवूडच्या चोप्रा बहिणी, प्रियांका आणि परिणीती आवाज देणार आहेत. प्रियांका आणि परिणीतीचा हा पहिला एकत्र प्रोजेक्ट असणार आहे.

वॉल्ट डिझ्नीच्या ‘फ्रोझन’ या चित्रपटाने बच्चे कंपनीच्या मनावर जादू केली होती. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘फ्रोझन २’ २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये देखील डब करण्यात येणार आहे. हिंदीमध्ये डब करताना चित्रपटातील ‘एल्सा’ आणि ‘अॅना’ या दोन मुख्य भूमिकांना अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा आवज देणार असल्याचे समोर आले आहे.

प्रियांकाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ‘फोझन २’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. हे पोस्टर शेअर करत प्रियांकाने ‘मिमि आणि तिशा आता एल्सा आणि अॅन होणार! डिझ्नीच्या फ्रोझन २ चित्रपटात पहिल्यांदाच चोप्रा बहिणी एकत्र येणार आहेत. आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येऊ’ असे लिहिले होते.

यापूर्वी शाहरुख खान आणि त्याचा मुलगा अब्राहम खानने ‘द लायन किंग’ या चित्रपटाला आवज दिला होता. तर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने ‘मॅलेफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ इविल’ या चित्रपटाला आवाज दिला आहे. प्रियांका चोप्राने यापूर्वीही ‘द जंगल बूक’ चित्रपटातील ‘का’ या भूमिकेला आवाज दिला होता. आता चाहत्यांमध्ये ‘फ्रोझन २’ चित्रपटाबाबतची कमलालाची उत्सुकता पाहायला मिळत आहे.