करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. फेब्रुवारीमध्ये डोकं वर काढलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अवघ्या तीन महिन्यातच देशाला विध्वंसक परिस्थितीत ढकललं आहे. दररोज लाखो लोक करोनाच्या तडाख्यात सापडत असून, अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहेत. भयावह गोष्ट म्हणजे दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा प्रचंड वेगाने वाढला असून, फक्त एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांत देशात ४५,००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर करत सोनू सूदची प्रशंसा केली आहे. या व्हिडीओमध्ये सोनू सूद ‘ज्या मुलांनी करोनामुळे पालकांना गमावले त्यांना मोफत शिक्षण द्या’ असे बोलताना दिसत आहे.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू सूद बोलताना दिसत आहे. ‘नमस्कार, मी सरकारला आणि जे लोकं मदतीसाठी पुढे येत आहेत त्यांना एक विनंती करु इच्छितो. आपण पाहिले आहे करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक लोकांनी त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींना गमावलेे. अनेक मुलांनी त्यांच्या पालकांना गमावले. कोणी दोन दिवसांपूर्वी आईला गमावले तर दोन दिवसांनंतर वडिलांना. अनेक मुलांच्या आई-वडील दोघांचेही निधन झाले. ही मुलं खूप लहान आहेत. या मुलांपैकी कोणी दहा वर्षांचे तर कोणी आठ वर्षांचे आहे. मी नेहमी विचार करतो या मुलांच्या भविष्याचे काय होणार? हे खूप महत्त्वाचे आहे’ असे सोनू सूद म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘मी सरकारला विनंती करतो केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा कोणतीही संस्था जे मदत करतंय त्यांनी एक नियम तयार करायला हवा. करोना काळात ज्या मुलांनी त्यांच्या पालकांना कमागवले त्या मुलांचे संपूर्ण शिक्षण, शाळेपासून ते कॉलेजपर्यंत, मग तो मुलगा सरकारी शाळेत शिक्षण घेत असो किंवा खासगी शाळेत त्यांचे शिक्षण हे मोफत व्हायला हवे. मग त्यांना इंजिनिअरींग, मेडिकल किंवा इतर कोणत्याही शाखेत शिक्षण घ्यायचे असेल तरीही त्यांचे संपूर्ण शिक्षण हे मोफत व्हायला हवे. हा एक नियम तयार करायला हवा. जेणे करुन ज्या मुलांनी करोनामुळे आपल्या पालकांना कमावले अशा मुलांचे भविष्य सुरक्षित राहिल. तसेच ज्या कुटुंबीयांनी घरातील कमावती व्यक्ती गमावली आहे अशा लोकांसाठी पण एक नियम तयार करायला हवे जेणे करुन त्यांना त्यांचे आयुष्य जगता येईल.’

प्रियांका चोप्राने हा व्हिडीओ शेअर करत ‘तुम्ही दूरदृष्टी असलेला समाजसेवक पाहिला आहे का? माझा मित्र सोनू सूद त्यांच्यामधील एक आहे. तो विचार करतो आणि पुढे योजना आखतो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.