रेश्मा राईकवार

तिच्या चित्रपटांमुळे तिला ‘देसी गर्ल’ ही उपाधी मिळाली. पण तिची महत्त्वाकांक्षा इतकी मोठी की, स्वत:ची बुद्धिमत्ता, गुणवत्ता, कला या सगळ्याला आपल्या देशापुरतं मर्यादित ठेवण्याचा विचार तिला कधी शिवला नाही. सध्या ही देसी गर्ल परदेशी सूनही आहे, मात्र कलाकार, गायिका, यशस्वी उद्योजक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या अष्टपैलू प्रियांका चोप्रा जोनासचा गेल्या तीन वर्षांतला प्रवास हा सगळ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावणारा आहे. आपल्याविषयीची बरी-वाईट सगळ्या प्रकारची चर्चा बाजूला ठेवून सतत पुढे जाण्याची, स्वत:ला विकसित करण्याची आपली महत्त्वाकांक्षाच जास्त मोठी ठरली असल्याचं प्रियांकाने सांगितलं.

सध्या शोनाली बोस दिग्दर्शित ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रियांका सध्या भारतात आहे. तीन वर्षांनंतर हिंदी चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर येते आहे. या तीन वर्षांत मायदेशी हिंदी चित्रपटसृष्टीत खूप बदल घडले असल्याचं तिने मान्य केलं. मी तिथं चित्रपट-मालिका करत असले तरी सातत्याने इथल्या घडामोडी पाहत होते. हिंदी चित्रपटांचा प्रेक्षक प्रचंड प्रमाणात बदलला आहे. पूर्वी तुमचं डोकं घरी ठेवून चित्रपट बघायला जा आणि दोन घटका करमणूक करून घ्या, असा सल्ला प्रेक्षकांना कळत-नकळत दिला जायचा. मात्र सध्या जगभरचा सिनेमा आणि त्याहीपलीक डे जात इंटरनेट, ओटीटी सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून हातात आलेला प्रचंड वेगळा आशय पाहणाऱ्या प्रेक्षकांना डोकं बाजूला ठेवून पाहायला लागणारं मनोरंजनच नको आहे. फुटकळ मनोरंजन ते सरळ नाकारतात. त्यामुळे छोटय़ा बजेटच्या चांगला आशय देणाऱ्या चित्रपटांनाही ते डोक्यावर घेतात आणि बिग बजेट चित्रपटांचाही आशय चांगला असेल तरच त्याचं स्वागत करतात, हा खूप मोठा बदल झाला आहे, असं प्रियांका म्हणते.

प्रेक्षकांच्या या बदललेल्या दृष्टिकोनामुळे निर्माते, दिग्दर्शक-कलाकार सगळ्यांच्याच विचारसरणीत खूप बदल झाला आहे. एके काळी आशयात्मक चित्रपट स्वीकारण्याचं धाडस मीही करू शकत नव्हते. आज मात्र मला ते खूप सहजसोपं आणि चांगलं वाटतं आहे. हा बदल सुखावणारा आणि प्रगतीकडे नेणारा असल्याचे मत तिने व्यक्त केलं. ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात प्रियांका दोन मुलांच्या आईच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. या चित्रपटाची पटकथा ऐकतानाच प्रियांका भावुक झाली होती. त्याची आठवण सांगताना ती म्हणते, एक तर हा चित्रपट वास्तव कथेवर आधारित आहे. आणि वास्तव आयुष्यात मी मातृत्व अनुभवलेलं नाही. मातृत्वाची जी भावना या कथेत होती तिने मला चित्रपटाशी जोडून घेतलं. यात जे जोडपं आहे, ते सोळाव्या वर्षी एकमेकांना भेटतं, एकमेकांच्या प्रेमात पडतं. आणि आज ते दोघंही पन्नाशीत आहेत. त्यांची दोन्ही मुलं वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे जग सोडून गेली आहेत. तरीही हे जोडपं खूप चांगल्या पद्धतीने, प्रेरणादायी आयुष्य जगतं आहे. त्यातही यातली आई आदिती जी आहे, तिचं जगण्याचं जे तत्त्वज्ञान आहे ते मला प्रभावित करून गेलं. आयुष्य भरभरून जगण्यावर विश्वास ठेवणारी आदिती प्रत्यक्षातही आयुष्य तुम्हाला जेव्हा चीतपट करतं तेव्हाही तुम्ही लाखोंचे धनी असल्यासारखे जगायला हवं, असं म्हणते. तिचा तो विचार मला पुढे जायला मदत करतो आणि म्हणून मी ही भूमिका स्वीकारली, असं प्रियांकाने सांगितलं.

या चित्रपटात ती पुन्हा एकदा फरहान अख्तरबरोबर दिसणार आहे. फरहानने एके काळी मला ‘डॉन’ चित्रपटात मोठी भूमिका देऊ केली होती. त्या वेळी माझा अनुभव हा जेमतेम तीन वर्षांचा होता, तरी त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. तो स्वत: एक उत्तम अभिनेता आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं हा नेहमीच एक चांगला अनुभव असतो. या वेळी मला निर्माता म्हणून त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि मी ती घेतली, असं प्रियांकाने सांगितलं.

या तीन वर्षांत परदेशात एक अभिनेत्री, गायिका, ‘बम्बल’सारखे डेटिंग अ‍ॅप आणि सॉफ्टवेअर कंपनीत गुंतवणूक करणारी उद्योजिका अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून तिने स्वत:ला सिद्ध के लं आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणते, महत्त्वाकांक्षा ही एकच अशी गोष्ट आहे, जी मला कायम पुढे जायला प्रवृत्त करत आली आहे. स्वत:ला सतत घडवत राहणं, आपल्यातले पैलू विकसित करणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. माझी हीच महत्त्वाकांक्षा माझं ध्येय बनलं. सतराव्या वर्षीपासून मी हा विचार जोपासला आणि तो कृतीतही आणला. मला वाटतं, मुलगा असो वा मुलगी, त्यांनी महत्त्वाकांक्षा बाळगलीच पाहिजे. ही महत्त्वाकांक्षाच तुम्हाला जगण्याचं ध्येय देते, असा अनुभवी सल्ला प्रियांका देते. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला आल्यावर प्रत्येक घटनेबद्दलचा तिचा विचार, तिने प्रत्येक वेळी लोकांसमोर आल्यानंतर मांडलेली मतं यांना खूप महत्त्व दिलं जातं. कामाच्या व्यापातून स्वत:ला प्रत्येक घडामोडींबद्दल जागरूक ठेवणं हे अवघडच काम असल्याचं तिने सांगितलं. सगळ्या घडामोडींची माहिती करून घेणं हे सोपं नाही, पण मी या क्षेत्रात वीस वर्ष आहे आणि या काळात अनेक स्त्रियांना मी माझ्याशी जोडून घेतलं आहे. ज्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी माझ्या व्यवसायाचा, सामाजिक कार्याचा आणि वैयक्तिक आयुष्याचाही डोलारा उभा केला आहे. त्यांना मी माझी ‘सर्पोट आर्मी’ असं म्हणते. त्यांच्यामुळे सातत्याने स्वत:ला अग्रणी ठेवणं सोपं झालं आहे, असं ती म्हणते.

अर्थात, हल्ली हे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीपद नानाविध कारणांमुळे नकोसं वाटतं. त्याबद्दल तर मला बोलायचंच आहे, असं म्हणणारी प्रियांका कलाकारांना ते कोयदेतज्ज्ञ असल्यासारखी वागणूक का दिली जाते, असा सवाल करते. ‘आपल्याकडे सेलिब्रिटी संस्कृती खूपच लोकप्रिय आहे. लोक विसरतात की, आम्ही फक्त कलाकार आहोत. आम्ही कायदे बदलू शकत नाही. आमच्या विचारांचा प्रभाव लोकांवर पडू शकतो. आम्ही सांगू शकतो लोकांना की हा विचार मला खूप आवडला. अमुक एक गोष्ट नाही पटली, असं आम्ही सांगू शकतो. पण कलाकारांची मतं लक्षात घेण्यात, त्यांना चूक-बरोबर ठरवण्यात, त्यांना ट्रोल करण्यात जो वेळ आपण घालवतो, तोच वेळ जर आपण कायदे बदलण्याची क्षमता असलेल्या लोकप्रतिनिधींवर चांगल्या अर्थाने दबाव आणण्यात घालवला तर त्याचा योग्य तो फायदा होईल’. आम्हा कलाकारांना बोल लावून काही उपयोग नाही. आम्ही फार तर त्यावर चित्रपट करू शकतो, त्यापलीकडे काही नाही. पण लोक हे समजून घेत नाहीत. ते कलाकारांबद्दल अतिआग्रही असतात, असं ती सांगते. मी कलाकार असले तरी मलासुद्धा इमिग्रेशनच्या रांगेत उभं राहावं लागतं, परवाना काढण्यासाठी आरटीओकडे जावं लागतं, मतदान करण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतं. मलाही तेच कायदे, नियम लागू होतात. त्यामुळे कलाकारांनाही सामान्यांसारखेच कायदे असतात, ते चमत्कार करू शकत नाहीत, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवं, असं ती आग्रहाने सांगते.

परदेशात अभिनेत्री, गायिका, उद्योजिका म्हणून तिने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले असल्याचं ती सांगते. एका नव्या देशात जाऊन नवी सुरुवात करणं अवघड आहे. त्यातही आपल्याकडे एकदा तिशी उलटली की नव्याने काही सुरू करणं शक्यच नसतं. मी बत्तिसाव्या वर्षी परदेशात नव्याने सुरुवात केली. तेव्हा मी स्वत: लोकांना भेटत होते. त्यांच्यासमोर मी अमुक एक भारतीय अभिनेत्री आहे, माझं आजवरचं काम आणि मला पुढे काय करायचं आहे याविषयी ओळख करून देत होते. ऑडिशन देत होते. त्यातून मी काम मिळवत गेले, प्रत्येक क्षेत्र नव्याने शिकत गेले, असं तिने सांगितलं. त्या वेळी चढउतार आले नाहीत असं नाही, पण माझ्यावर विश्वास असणारी आणि माझ्या पाठीशी उभी राहणारी जी मंडळी होती त्यांच्याआधारेच मी ही अवघड वाट चालू शकले. मात्र त्यासाठी तुमची इच्छाशक्ती आणि प्रयत्न असायलाच हवेत, असं तिने सांगितलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेत्री, निर्माती, उद्योजिका म्हणून आपला ठसा उमटवत असतानाच प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मितीही तिने त्याच जोरात सुरू ठेवली आहे. मी आत्तापर्यंत तीन मराठी चित्रपट केले आणि त्यातल्या दोन मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, याचा मला खूप आनंद वाटतो. मी जे चित्रपट निवडते आहे, ज्या चित्रपटांवर काम करते आहे ते लोकांना आवडत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचतायेत याबद्दल समाधान आहे. पण एवढय़ावरच मी थांबणार नाही, सध्या ‘पाणी’ प्रदर्शित करण्यावर माझा भर आहे. त्यानंतर नव्या चित्रपटावर काम सुरू होईल, असंही तिने स्पष्ट केलं.

प्रियांकाची ही चौफेर घोडदौड आपल्याला थकवणारी असली तरी तिच्यासाठी तिला पुढेच नेणारी आहे, हे आग्रहाने सांगणारी देसी गर्ल म्हणूनच सध्या सगळ्यांना प्रेरणादायी वाटते आहे, यात शंका नाही.