‘क्वांटिको’ या सिरीजमुळे सध्या प्रियांका चोप्रा हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेत आहे. ‘फोर्ब्स’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या एका यादीमध्ये प्रियांका चोप्राच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे प्रियांका एक ‘ब्रॅण्ड’ झाली आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. आपल्या अभिनयाने आणि विविध धाटणीच्या भूमिकांमुळे प्रियांकाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांका अभिनय क्षेत्रातील तिच्या सुरुवातीच्या काळातील दिवसांबद्दल बोलली आहे.

काही वर्षांपूर्वी प्रियांका तिच्या चित्रपटासाठी एका मोठ्या कंपनीसोबत करारावर स्वाक्षरी करत होती. पण, त्या करारामध्ये असे स्पष्ट लिहिण्यात आले होते की, ‘चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जर ती गरोदर झाली तर तिच्यासोबतचा करार रद्द करण्यात येईल’. त्या करारारातील ही अट वाचताच आपल्याला फार राग आल्याचे प्रियांका या मुलाखतीदरम्यान म्हणाली. ‘तुम्ही मला असं कसं म्हणू शकता की, मी गरोदर नाही होऊ शकत?, माझ्या आजारपणाविषयी तुम्ही काहीही बोलत नाही आहात, ना माझ्या वजनाबद्दल तुम्ही काही बोलत आहात. फक्त गरोदरपणावरच प्रश्न का?’, अशा शब्दात प्रियांकाने तिचा राग व्यक्त केला आहे. या एका कारणामुळे प्रियांकाचे मोठे भांडण झाले होते अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. ‘मी गरोदर राहिल्यावर काम करु नाही शकते तर तुम्हाला करार रद्द करण्याचा अधिकार आहे. पण, मी गरोदर राहिल्यावर जर मी काम करु इच्छित असेन आणि तुम्हाला माझ्याकडून चित्रपटासाठी काम करुन घ्यायचे नसेल तर हा करार रद्द करण्याचा मला आधिकार असेल’, असेही प्रियांकाने त्यावेळी स्पष्ट केले होते.

प्रियांकाच्या या वक्तव्यामुळे सध्या ती चर्चेत आली आहे. तुर्तास प्रियांका तिच्या स्पष्ट आणि ठाम वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ही देसी गर्ल ‘क्वांटिको २’ या सिरीजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सिरीजनंतर प्रियांका ‘बेवॉच’ या चित्रपटातूनही झळकणार आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसलेली प्रियांका हॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे.