‘क्वांटिको’ मालिकेमुळे ‘ग्लोबल स्टार’ झालेली प्रियांका येणाऱ्या काही काळात दोन महत्त्वाच्या हॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे. प्रियांकानं ‘भारत’ चित्रपटाला ऐनवेळी सोडचिठ्ठी दिल्यामुळे कदाचित ती आता बॉलिवूड चित्रपटात दिसणार नाही असंच अनेकांना वाटू लागलं आहे मात्र प्रियांकानं हृतिकसोबत ‘क्रिश ४’ मध्ये काम करायला हिरवा कंदील दिला आहे.

२००३ साली आलेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटाचा ‘क्रिश ४’ चौथा भाग असणार आहे. हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘कोई मिल गया’ हा चित्रपट खूपच गाजला. त्यानंतर हृतिक रोशन पुढच्या भागांत सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला. ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अनुक्रमे २००६ आणि २०१३ मध्ये हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या तिन्ही चित्रपटांच्या यशानंतर ‘क्रिश ४’ येणार असल्याचाही मानस निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांनी बोलून दाखवला. मात्र पाच वर्षे उलटले तरी ‘क्रिश ४’ अजूनही पडद्यावर आला नाही.

‘क्रिश ४’ मध्ये प्रियांकानेच भूमिका साकारावी अशी राकेश रोशन यांची इच्छा होती. मात्र प्रियांकाचं लग्न आणि तिच्या पदरात असलले नवीन हॉलिवूड चित्रपट यामुळे कदाचित ती नकार देईल अशी भीती रोशन यांना होती. मात्र बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार ‘क्रिश ४’ मध्ये काम करायला प्रियांकानं होकार दिला आहे. प्रियांकाच्या उमेदीच्या काळात राकेश रोशन यांनी तिला क्रिश सारख्या बिग बजेट सिनेमात झळकण्याची संधी दिली होती. त्यामुळे तिनंही लगेचच राकेश रोशन यांच्यासोबत काम करायला हिरवा कंदील दिला आहे. २०२० पर्यंत ‘क्रिश ४’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २०१९ पासून ‘क्रिश ४’ च्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे.