बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपला नावाचा दबदबा राखणारी प्रियांका चोप्रा क्वांटिको अमेरिकन टीव्ही शोमधून घराघरात पोहोचली. ही टीव्ही मालिका अमेरिकेत एवढी गाजली की मालिकेचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रियांकाने स्वतः या सीझनची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा नवीन लूक शेअर केला.

क्वांटिकोच्या या नवीन सीरिजमध्ये ती फार मादक दिसते. यावेळी तिने एक वेगळी हेअरस्टाईल केली आहे. तिने केस कापले असून इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना ती म्हणाली की, जेव्हा आपण नवीन हेअर कट करतो तेव्हा केसांना सारखे हात लावून ते व्यवस्थित आहेत की नाही ते पाहतो.

प्रियांका गेल्या काही दिवसांपासून न्युयॉर्क शहरात आहे. ‘क्वांटिको’ या टीव्ही सिरीअलच्या तिसऱ्या सीझनमध्येही तिची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. प्रियांकाने ‘क्वांटिको’च्या सीझन १ आणि २ मध्ये एजेंट एलेक्स पेरिशची व्यक्तिरेखा साकारली होती. आता या तिसऱ्या सिझनमध्येही तिला प्रेक्षकांचे प्रेम मिळणार की नाही हे लवकर कळेलच. प्रियांकाने ‘बेवॉच’ या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारली होती.