अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. अनेक हॉलिवूड मालिका, चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. गायक, अभिनेता निक जोनससोबत लग्न केल्यानंतर ती जास्तच चर्चेत आली. नुकतंच तिने मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकनं जाहीर केली. आता तिला अजून एका पुरस्कार सोहळ्याची नामांकनं जाहीर करण्याची संधी मिळाली आहे.

७४ व्या ब्रिटीश अकॅडमी चित्रपट पुरस्कार जाहीर करण्याची संधी प्रियांकाला मिळाली आहे. हा सोहळा १० आणि ११ एप्रिल रोजी रॉयल अल्बर्ट हॉल इथे होणार आहे. प्रियांका सध्या लंडनमध्ये आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून बाफ्ताच्या ऑफिशियल पेजवरची पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणते, “हा माझा सन्मान आहे. रविवारी हे पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी फार उत्सुक आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by BAFTA (@bafta)

या पुरस्कार सोहळ्यात राईजिंग स्टार पुरस्कार ती जाहीर करणार असून हा पुरस्कार नव्या लोकांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येतो. रिचर्ड ग्रांट, टॉम हिडलस्टन, फेलिसिटी जोन्स, जेम्स मेकएव्हॉय, डेव्हिड ऑयलोव्हो, पेड्रो पास्कल हे कलाकारही पुरस्कार जाहीर करतील. प्रियांका आणि लंडनमधील इतर कलाकार तसंच लॉस एंजिलीसमधीलही कलाकार व्हर्च्युअल पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होतील.

प्रियांका नुकतीच ‘द व्हाईट टायगर’ या नेटफ्लिक्सच्या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाची निर्मितीही प्रियांकाने केली आहे. यावर्षीच्या बाफ्ता पुरस्कारासाठी या चित्रपटाला २ नामांकने मिळाली आहेत. प्रमुख भूमिकेसाठी आदर्श गौरव याला नामांकन आहे तर सर्वोत्कृष्ट पुस्तकाधारित पटकथेसाठी लेखक दिग्दर्शक रमिन बहरामी यांना नामांकन मिळालं आहे.

प्रियांका आणि तिचा पती निक जोनस यांनी नुकतंच ऑस्कर २०२१ची नामांकने जाहीर केली.