अभिनेत्री प्रियांका चोप्राने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, ‘मेरी कोम’ सारख्या चित्रपटातून मी एखाद्या अॅथलीटची भूमिका साकारेन, असे मला कधीही वाटले नव्हते, असे प्रियांकाने सांगितले. या चित्रपटातून एखाद्या बॉक्सरची भूमिका साकारण्यापर्यंतचा हा प्रवास माझ्या विचारशक्तीपलीकडचा असल्याचे तिने सांगितले. मला सुरूवातीपासूनच खेळांविषयी विशेष माहिती नव्हती. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने एक अॅथलीट म्हणून मला अनेक नवीन धडे शिकायला मिळाले. एखादी मुलगी शरीराचे स्नायू आणि दंड वाढवण्यासाठी मेहनत घेत आहे, असा विचारसुद्धा कोणी करू शकेल काय? मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने हे सगळे प्रत्यक्षात उतरल्याचे प्रियांका चोप्राने सांगितले. ‘मेरी कोम’च्या निमित्ताने मी एक गोष्ट शिकले ती अशी की, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी निर्धारपूर्वक प्रयत्न करायचे ठरवल्यास, तुमच्या जीवनात काहीही घडू शकते, तुम्ही काहीही करू शकता. या चित्रपटाचा प्रवास माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रियांकाने यावेळी सांगितले. येत्या ५ सप्टेंबर रोजी ‘मेरी कोम’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.