बॉलिवूड सिनेसृष्टीत सध्या रणवीर सिंगच्या ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाची चर्चा आहे. भारताकडून हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी पाठवण्यात आला आहे. ऑस्कर हा चित्रपट क्षेत्रातील आजवरच्या सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या पुरस्कारावर नाव कोरणे काही सोपी गोष्ट नाही. कारण जगभरातील सर्वोत्तम असे शेकडो चित्रपट या स्पर्धेत भाग घेतात. बॉलिवूडचा आजवरचा इतिहास पाहता ऑस्करच्या बाबतीत आपली पाटी अद्याप कोरीच आहे. परंतु या वेळी या कोऱ्या पाटीवर ‘गल्ली बॉय’चे नाव लिहिता यावे यासाठी स्वत: देसी गर्ल प्रियांका चोप्रा मैदानात उतरली आहे.

‘गल्ली बॉय’लाऑस्कर पुरस्कार मिळावा, यासाठी प्रियांकाने या चित्रपटाचा जोरदार प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरस्काराचे नामांकन येत्या डिसेंबर महिन्यात घोषित केले जाणार आहे. या नामांकन यादीत ‘गल्ली बॉय’ला स्थान मिळावे यासाठी स्वत: प्रियांका प्रयत्न करत आहे. प्रियांकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही नवी घोषणा केली आहे. यासाठी तिच्याकडे एक विशेष योजना आहे. येत्या काळात या नव्या योजनेची माहिती सर्वांना मिळेल. दरम्यान ही योजना यशस्वी होण्यासाठी इतर बॉलिवूड कलाकारांनी देखील सहकार्य करावे अशी विनंती तिने केली आहे.

अस्तित्व सिद्ध करुन दाखविणारा ‘गली बॉय’

‘गली बॉय’.. धारावीच्या गल्ल्यांमध्ये लहानाचा मोठा झालेल्या एका रॅपरची कथा. समाजामध्ये दोन वर्ग निर्माण झाले आहेत. एक उच्चभ्रू लोकांचा तर दुसरा गरीबी आणि दारिद्रय यांच्याशी संघर्ष करणारा. दारिद्र्याच्या गर्तते अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची कथा, त्याचं दु:ख मुराद अर्थात गली बॉय (रणवीर सिंह) त्याच्या रॅपमधून समाजासमोर मांडतो. या दु:खाला वाचा फोडत असतानाच त्याचं नशीब त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतं आणि तो ठरतो देशातला सर्वात प्रसिद्ध असा रॅपर. या प्रसिद्ध रॅपरची कथा समाजापुढे मांडण्यासाठी दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी केलेला प्रयत्न या चित्रपटातून स्पष्ट दिसत आहे. किंबहुना तो यशस्वीही ठरला आहे.