अभिनेत्री प्रियांका चोप्राने भारताची बॉक्सर एमसी मेरी कोमच्या बायोपिककमध्ये मेरी कोमची भूमिका साकारली होती. या सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. गुरुवारी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमला हार पत्करावी लागली. कोलंबियाच्या इंग्रिट व्हॅलेन्सियाने मेरीवर ३-२ अशी मात केली. त्यामुळे लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या ३८ वर्षीय मेरीचं ऑलिम्पिक सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं. असं असलं तरी अनेकांनी मेरी कोमच्या कामगिरीचं कौतुक केलंय. यातच प्रियांकाने देखील मेरीचं कौतुक केलं.

प्रियांकाने ट्विटरवर मेरी कोमचा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. यात ती म्हणाली, “खरे चॅम्पियन असे दिसतात. खूप छान मेरी कोम… जिद्द आणि निष्ठेच्या जोरावर पुढे जाणं शक्य आहे हे तू दाखवून दिलंस. तू आम्हाला प्रेरणा दिली आहेस. प्रत्येक वेळी तू आम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.” असं म्हणत प्रियांकाने मेरीचं कौतुक केलंय.

हे देखील वाचा: “काम नसेल तर…”, सुनील पालच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज वायपेजीचं उत्तर

पराभूत झाल्यानंतरही मेरीने कोणत्याही प्रकारची निराशा न दाखवता खुल्या मनाने व्हॅलेन्सियाला आलिंगन दिले. त्याशिवाय कारकीर्दीतील अखेरचा ऑलिम्पिक सामना खेळल्याचे संकेत देत तिने चारही दिशेने हात उंचावून अभिवादन केले. त्यामुळे जगभरातील क्रीडा चाहत्यांकडून मेरीवर कौतुकाचा वर्षावही करण्यात येतोय.

२०१४ सालामध्ये आलेल्य ‘मेरी कोम’ या सिनेमाचं दिग्दर्शन उमंग कुमार यांनी केलं होतं. या सिनेमासाठी प्रियांका चोप्राने मोठी मेहनत घेतली होती. यासाठी तिने बॉक्सिंगचे धडे देखील घेतले होते. या सिनेमातील प्रियांकाच्या भूमिकेचं मोठं कौतुक झालं होतं.