बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. आज प्रियांका लोकप्रियतेच्या आणि यशाच्या शिखरावर आहे. मात्र, इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. कलाविश्वात येण्यापूर्वी अनेकांनी तिला तिच्या रंगावरुन ट्रोल केलं होतं. याविषयी प्रियांकाने तिच्या ‘अनफिनिश’ या पुस्तकात भाष्य केलं आहे.  अलिकडेच प्रियांकाने या पुस्तकाच्या निमित्ताने एक मुलाखत दिली असून तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“दक्षिण आशियातील देशात फेअरनेस क्रीम वापरणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. हे एवढं मोठं क्षेत्र आहे की तिथे जवळपास प्रत्येक व्यक्ती फेअरनेस क्रीमचा वापर करतांना दिसते. खरं तर या जाहिरातींमध्ये गोरा रंग असणाऱ्या अभिनेत्रींना प्राधान्य दिले जाते हे फार चुकीचे आहे. माझ्यासाठी तर हे खूपच त्रासदायक होतं. लहान असताना सावळ्या रंगामुळे मी सुंदर दिसत नाही असं मला वाटायचं त्यामुळे मी कायम टॅल्कम पावडर, क्रीम लावायचे ,”असं प्रियांका म्हणाली.

दरम्यान, यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये देखील प्रियांकाने वर्णभेदावर भाष्य केलं होतं. “जेव्हा मी १३ वर्षांची होते तेव्हा कायम मला माझा रंग बदलायला हवा असे वाटायचे. त्यावेळी मला या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटायचं. किंबहुना त्याची सल आजही मला जाणवत होती. त्यामुळेच मी फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करणं बंद केलं.”

दरम्यान, प्रियांकाचा कलाविश्वामध्ये पदार्पण करण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेकांनी रंगावरुन, उंचीवरुन ट्रोल केलं होतं. इतकंच नाही तर सावळ्या रंगामुळे अनेकदा ती कुटुंबातही मस्करीचा विषय ठरली होती.