प्रियांका चोप्रा ही आता ग्लोबल स्टार झाली आहे. आज जगातील सर्वाधिक सुंदर आणि प्रभावशाली महिलांमध्ये प्रियांकाची गणना होते. अठरा वर्षांपूर्वी प्रियांकानं ‘मिस इंडिया’ हा किताब पटकावला होता. मात्र हा किताब तिला द्यावा की नाही यावरून काही परीक्षकांमध्ये संभ्रम होता. प्रियांका खूपच सावळी असल्याचं मत एका परीक्षकाचं होतं त्यामुळे तिला हा किताब देण्याविरोधात एक परीक्षक होता असा गौप्यस्फोट मेंटॉर प्रदीप गुहा यांनी केला आहे.

‘प्रियंका चोप्रा : द इनक्रेडेबिल स्टोरी ऑफ अ ग्लोबल बॉलीवुड स्टार’ हे असीम छाब्रा लिखित पुस्तक लवकरच प्रदर्शित होत आहे. या पुस्तकात मिस इंडिया स्पर्धेचे परीक्षक प्रदीप गुहा यांनी धक्कादायक आरोप केला आहे. ‘त्यावेळी परीक्षक प्रियांकाच्या बाजूनं नव्हते. ती खूपच सावळी आहे असंही एका परीक्षकानं त्यावेळी म्हटलं होतं. रंगावरूनच तिला मिस इंडिया हा किताब द्यावा की नाही असा वाद परीक्षकांमध्ये होता. तेव्हा मीच म्हणालो होतो दक्षिण अमेरिकेतल्या मुलीही वर्णानं सावळ्या असतात. पण तरीही त्या सुंदर असतात. कित्येक सौंदर्यस्पर्धांचे किताब त्या पटकावतात मग प्रियांकाबद्दल विचार करण्यासारखं काय आहे.?असं गुहा म्हणाले होते.

प्रियांकानं मिस इंडिया हा किताब जिंकला. यावेळी लारा दत्ता आणि प्रियांका चोप्रामध्ये तीव्र स्पर्धा होती. मात्र लारानं ‘मिस इंडिया युनिव्हर्स’ हा किताब पटकावला तर ‘मिस इंडिया’ किताब पटकावत प्रियांका रनर अप ठरली. काही दिवसांपूर्वी प्रियांकानंही एक कटु अनुभव शेअर केला होता. आपण सावळ्या वर्णाचे असल्यानं हॉलिवूडमधल्या दिग्दर्शकानं आपल्याला चित्रपट नाकारला होता असंही ती म्हणाली होती.