अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वामध्ये चर्चा रंगली होती. मात्र आता हे लग्न होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इशिता आणि सिद्धार्थ या दोघांनी परस्पर संमतीने हे लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

इशिता आणि सिद्धार्थ या दोघांचा फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता. हे दोघं एप्रिल महिन्यामध्ये विवाहबंधनातही अडकणार होते. त्यासाठी प्रियांकादेखील भारतामध्ये आली होती. मात्र आता हे लग्न होणार नाहीये.

काही दिवसांपूर्वी इशिताची एक लहानशी सर्जरी झाली होती. त्यामुळे हे लग्न रद्द करण्यात आलं असून दुसरा मुहूर्त पाहण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान,प्रियांका भावाच्या लग्नासाठी आली आहे असंच सगळ्यांनाच वाटत होतं. पण लग्नाच्या तारीखेपूर्वीच ती अमेरिकेला परत गेली. लग्नाची तारीख उलटून गेली आणि तरीही लग्नाची बातमी आली नाही हे लक्षात आल्यावर सगळेच आश्चर्यचकीत झाले. तेव्हा प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी हे लग्न होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.