आताच्या ‘टेक्नोसॅव्ही’ जमान्यात इंटरनेट आणि स्वस्त दरात मोबाइल सुविधा पुरवणाऱ्या सेवांकडे अनेकांचेच लक्ष लागून राहिलेले असते. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी ‘रिलायन्स जिओ’ची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘डिजिटल इंडिया’चे लक्ष नजरेत ठेवत सुरु करण्यात आलेल्या ‘रिलायन्स जिओ’चीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. अनेकजण ‘रिलायन्स जिओ’ची सेवा अनुभवण्यासाठी सध्या धाव घेत आहेत. देशातील जनतेने ‘जिओ’ कनेक्शनसाठी घेतलेल्या धावेमध्ये चक्क अभिनेत्री प्रियांका चोप्राचाही समावेश आहे.
प्रियांकानेही या नव्या कनेक्शनसाठी अर्ज केले असल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्याबाबतच्या अर्जाची एक प्रतही सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल झाला आहे. ‘जिओ’साठी उत्सुक असणाऱ्यांच्या गर्दीमध्ये प्रियांका चोप्रासारख्या अभिनेत्रीचे नाव पाहून सध्या सगळेजण थक्क झाले आहेत. प्रियांकाने खरोखरंच हा अर्ज केला आहे का? यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. हा प्रियांकाचाच अर्ज आहे याबाबत काही अधिकृत माहिती मिळाली नसली तरीही या अर्जावर प्रियांकाचा पासपोर्ट साइज फोटो, तिची सही आणि इतर माहिती नमूद करण्यात आली आहे. प्रियांका सध्या तिच्या ‘क्वांटिको’ या सिरीजच्या दुसऱ्या सिझनच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे.
दरम्यान स्वस्त डेटा प्लॅन्समुळे रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवली असून दिडशे रुपयांपासून पाच हजार रुपये प्रति महिनापर्यंतचे डेटा प्लॅन्स रिलायन्स जिओने बाजारात आणले आहे.
रिलायन्स जिओचे डेटा पॅकची सुरुवात पाच पैसे प्रति एमबी किंवा ५० रुपये प्रति एक जीबीने झाली आहे. याशिवाय रिलायन्स जिओने मोफत कॉलिंगची सुविधाही दिली आहे. त्यामुळे अन्य मोबाईल ऑपरेटर कंपन्यांचे धाबे दणाणलेत. एअरटेल, आयडिया, व्होडाफोन यासारख्या कंपन्यांनाही आता विद्यमान प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सवर 67 टक्के अतिरिक्त डेटा द्यावा लागला. एअरटेलने काही प्लॅन्समध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग द्यायला सुरुवात केली आहे. जगभरात अत्यल्प दरात व्हॉईस कॉलिंगची सुविधा असलेल्या देशांमध्ये भारताचा नंबर लागतो. आता रिलायन्स जिओमुळे भारतात अत्यल्प दरात डेटा प्लॅन्स मिळणार आहेत. भविष्यात जिओमुळे हा संघर्ष आणखी तीव्र होईल यात शंका नाही.