आसाम राज्याची ब्रँड अॅम्बेसिडर अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका नव्या वादात अडकली आहे. आसाम टूरिझमच्या कॅलेंडरवरील तिच्या फोटोमुळे हा वाद निर्माण झाला असून राज्याच्या विधानसभेतही त्याचीच चर्चा होत आहे. कॅलेंडरवरील फोटोमध्ये प्रियांका तोकड्या कपड्यांत दिसत असून त्यातून आसामच्या संस्कृतीचे चुकीचे दर्शन होत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे ब्रँड अॅम्बेसिडर पदावरून तिला काढून टाकण्याचीही मागणी काँग्रेसने केली आहे.

बोकोच्या आमदार नंदिता दास आणि दुसऱ्या आमदार रुपज्योती कुर्मी यांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली. ‘आसामी समाजाचा आदर सरकारने जपणे महत्त्वाचे आहे. फ्रॉक हा काही आसामी पोशाख नसून कॅलेंडरवरील फोटोंमध्ये अंगप्रदर्शन करण्यात आले. आसामी समाजाची प्रतिष्ठा कशाप्रकारे टिकवून ठेवता येईल, हे सरकारला माहित असावे. फ्रॉकऐवजी पारंपरिक आसामी पोशाख ‘मेखेला सादोर’देखील परिधान करता आले असते,’ अशा शब्दांत कुर्मी यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आसाममध्ये बऱ्याच प्रतिभावान अभिनेत्री असून त्यापैकी कोणालाही ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त करावे अशी मागणीही कुर्मी यांनी केली.

दुसरीकडे आसाम पर्यटन विकास महामंडळानेही (ATDC) याप्रकरणी त्यांची बाजू मांडली. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आसामचा प्रचार करण्यासाठी हे कॅलेंडर तयार करण्यात आले. काही प्रमुख आंतरराष्ट्रीय पर्यटन संचालक आणि मान्यवरांनाही कॅलेंडर पाठवण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रियांकाची ओळख चांगली असून कॅलेंडवरील तिच्या फोटोमुळे आसामच्या संस्कृतीला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचत नाही,’ असे आसाम पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष जयंत मल्ला बरुआ यांनी स्पष्ट केले.