संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि त्यात मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही याबाबतची माहिती देण्यात आली. करणी सेनेचा विरोध आणि जीवे मारण्याच्या धमक्या या सर्व गोष्टींमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करत ‘पद्मावत’ बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. पण, त्याआधीपासूनच २५ जानेवारी हा दिवस आणखी एका चित्रपटासाठी खूपच खास असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तो चित्रपट म्हणजे आर. बाल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’.

‘पॅडमॅन’ आणि ‘पद्मावत’ हे दोन्ही वेगळ्या धाटणीचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यामुळे कलाविश्व आणि चाहत्यांच्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न घर करुन लागले आहेत. स्टार कास्ट, कथानक आणि कलाकारांची मेहनत या सर्वच गोष्टींमध्ये दोन्ही चित्रपट उजवे असतील यात शंका नाही. पण, एकाच दिवशी ते प्रदर्शित होत असल्यामुळे त्याचा फटका मात्र दोन्ही चित्रपटांना बसणार असल्याचा महत्त्वाचा मुद्दा अभिनेत्री ट्विंकल खन्नाने मांडला आहे.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना 

एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ट्विकलने हे वक्तव्य केले. ‘या दोन्ही चित्रपटांसाठी सुखद धक्का वगैरे नक्कीच नाही. कारण त्याचा फटका दोन्ही चित्रपटांना बसणार आहे. त्यांनी (पद्मावत चित्रपटाच्या टीमने) अनेक अडचणींचा सामना केला तेव्हा कुठे जाऊन चित्रपटाच्या वाटेतील अडथळे दूर झाले. पण, ‘पॅडमॅन’च्या एक आठवडा आधी किंवा एक आठवडा नंतर तो चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा होता, असं मला वाटतं’, असे ट्विंकल म्हणाली.

वाचा : पुन्हा चरित्रपटांची लाट!

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपट दिग्दर्शनाची प्रशंसा करत ट्विंकलने ‘पॅडमॅन’च्या कथानकावर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही चित्रपटाच्या बाबतीत आता कोणतेच बदल करणार नसल्याचेही तिने मिश्किलपणे हसत म्हटले. यावेळी तिने अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाविषयीसुद्धा आपले मत मांडले. चित्रपटांची निवड करण्याच्या बाबतीत आणि त्या अनुषंगाने स्वत:मध्ये काही बदल घडवून आणण्याच्या त्याच्या सवयीचे तिने कौतुक केले. एक निर्माती म्हणून ट्विंकल ‘पॅडमॅन’च्या बाबतीत आशावादी आहे. तेव्हा आता खिलाडी कुमार आणि त्याने साकारलेल्या या कलाकृतीकडून असलेल्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.