करोना लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टीची आर्थिक कोंडी झाली असताना मराठी चित्रपट निर्मात्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. मराठी चित्रपट कुठे आणि कसे प्रदर्शित करायचे हा प्रश्न निर्मात्यांपुढे उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपटांचे सॅटेलाइट राइट्स सहजपणे विकले जात नाहीत, त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपट जास्तीत जास्त प्रदर्शित करण्यावर भर दिला पाहिजे, असं मत निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी मांडलं.

मराठी चित्रपटांना कशाप्रकारे फटका बसतोय याविषयी ते म्हणाले, “मराठी चित्रपटांसाठी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे पर्याय एक किंवा दोन आहेत. त्यामुळे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजिटल थिएटर हेच पर्याय आहेत. पुढील काळात येणारे चित्रपट हे थिएटरच्या दृष्टीने कमी तर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दृष्टीने जास्त बनवले जातील.”

अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांनी चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग अवलंबला आहे. मात्र, ‘ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी शासनाकडून अनुदान मिळावं’, अशी मागणी प्लॅनेट मराठीचे संचालक अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना पत्रसुद्धा लिहिलं आहे.