स्वत:वर गोळी झाडून हत्येचा प्रयत्न केल्याचा खोटा दूरध्वनी पोलिसांकडे करणारा चित्रपट निर्माता हरदेव सिंह आणि त्याचा नातेवाईक देवेंद्रला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मोबाईल फोन, काही रक्कम आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अभिनेता सलमान खान आणि त्याच्याकडे व्यवस्थापक पदावर काम करत असलेल्या रेश्मा शेट्टीवर संशय व्यक्त करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी हरदेवने आपल्यावर गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. सखोल तपास केला असता तक्रारदार खोटे बोलत असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसी खाक्या दाखविताच तक्रारदाराने याबाबतचे सत्य पोलिसांना सांगितले. हरदेवने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी जस्मीत शेट्टी आणि मुलगी मुंबईत एका चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघींनी सलमानच्या घराशेजारी एक खोली भाड्याने घेतली होती. त्यांना सलमानकडून चित्रपटातील एक गाणे गाऊन घ्यायचे होते. परंतु, या बदल्यात सलमानच्या व्यवस्थापकाने मोठ्या रकमेची मागणी केली. हरदेवची पत्नी जस्मीत शेट्टी आणि मुलीने सलमानला भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी त्याच्या घराबाहेर मोठा हंगामा केला होता.
हरदेवने हा सर्व प्रकार त्याचा भाऊ देवेंद्रला सांगितला. चित्रपट बनविण्याच्या नादात आणि सलमानला चित्रपटात घेण्याच्या हट्टापायी त्याचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी या दोन्ही भावांनी दिल्लीत सलमान आणि रेश्माविरुध्द हत्येचा प्रयत्न करण्याचा खटला भरून, त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्याची योजना बनवली.