करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अगदी लॉकडाउन जारी करुनही करोनाचा फैलाव अद्याप थांबलेला नाही. देशात चौथा लॉकडाउन सुरु असून आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटीपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या घरी दोन जण करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

करणच्या घरात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच करणने याविषयीची माहिती बीएमसीला दिली. त्यानंतर या दोन्ही व्यक्तींना करणच्या घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तसंच करणच्या घराची संपूर्ण इमारत सॅनिटाइज करण्यात आली आहे.

“कुटुंबातील अन्य लोक आणि संपूर्ण स्टाफ सुरक्षित आहे. इतरांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. आम्ही सकाळीच सगळ्यांनी करोनाची चाचणी केली. मात्र सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत. परंतु, सुरक्षेच्यादृष्टीने आम्हा सगळ्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवलं आहे”, अशी माहिती करणने दिली.

पुढे तो म्हणतो, “घरातील ज्या दोन सदस्यांना करोनाची लागण झाली आहे, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. हा खरचं कठीण क्षण आहे. मात्र घरात राहून आणि योग्य ती काळजी घेऊन आपण या संकटावर मात करु. सगळ्यांनी घरात रहा आणि काळजी घ्या”.

दरम्यान, सध्या दिवसेंदिवस करोना रुग्णांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. अलिकडेच अभिनेता किरण कुमार यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आतापर्यंत कलाविश्वातील काही कलाकारांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.