सध्या देशात सर्वत्रच शेतक-यांची आत्महत्या व दुष्काळावर गांभीर्याने चर्चा सुरु आहे. आणि याच विषयावर आता एक हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचे नाव आहे ‘प्रोजेक्ट मराठवाडा’. नुकताच मुंबईत या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाची कथा ही देशातील शेतक-यांच्या जीवनातील गंभीर परिस्थितीवर आधारित असून, प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या का करत आहेत, या विषयावर हा चित्रपट आधारित आहे. शेतक-यांचे दु:खच या चित्रपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटात मुख्य भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी दिसणार असून ते तुकाराम नावाच्या शेतक-यांची व्यथा मांडणार आहेत. यावेळी ओम पुरी यांनी सांगितले की, ‘हा चित्रपट म्हणजे सध्याच्या राजकीय अनागोंदीचा व त्याला बळी पडलेल्या शेतक-यांची सत्यकथा आहे. चित्रपटात आजच्या ज्वलंत परिस्थितीचे चित्रीकरण आहे.’ चित्रपटात ओमपुरी यांच्यासह सीमा विश्वास, गोविंद नामदेव, दिलीप ताहिल, फराह केदार, क्रारोल, कुणाल सेठ, राहूल पटेल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन भावीन वाडिया यांनी केले असून, या चित्रपटाला पार्श्वसंगीत संजोय चौधरी यांनी दिले आहे. जयरुश एंटरटेन्मेन्ट व वाडिया निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे प्रकाश पटेल, जिगना पटेल आणि जय प्रकाश पटेल निर्माते आहेत.

पाहा ‘प्रोजेक्ट मराठवाडा’चा ट्रेलर