परीनिरीक्षण मंडळाच्या कचाटय़ात सापडलेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाची अनेक मान्यवरांनी जोरदार पाठराखण केली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे हंसल मेहत यांनीही स्वत: कित्येकदा मंडळाच्या या मनमानी कारभाराचा अनुभव घेतला आहे. ‘सत्य कधी राज्याची बदनामी करू शकते? एखाद्या वास्तव परिस्थितीचा आरसा चित्रपटातून सरकारी यंत्रणांसमोर धरला तर त्याची या संस्थांनी धास्ती घेण्याची गरज काय?’ असा सवाल हंसल मेहतांनी केला आहे.

दिग्दर्शक महेश भट्ट यांनी थेट निहलानींवर टीका केली आहे. ‘उडता पंजाब’बद्दल आम्ही जे सांगू तेच शेवटचे सत्य आहे असे सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे आहे. देशातील लोकांना काय हवे हे ते सांगू शकतात, असे भट्ट यांनी स्पष्ट केले आहे. विचारस्वातंत्र्यासाठी हा काळाकुट्ट दिवस असल्याचे मुकेश भट्ट यांनी म्हटले आहे.

सेन्सॉर बोर्डाचा आणि सेन्सचा काही संबंध उरलेला नाही, अशी टीका अभिनेता के के मेनन याने केली आहे.

एरव्ही वादांपासून दूर राहणारे निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनीही ‘उडता पंजाब’ आजच्या वास्तव परिस्थितीचे चित्रण करणारा आहे. वास्तवाची गळचेपी केल्याने संभ्रमावस्था निर्माण होते, असे सांगत जे न्याय्य आहे त्यासाठी संपूर्ण इंडस्ट्रीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन केले आहे. शाहीद कपूर, आलिया भट, करिना कपूर आणि दिलजित दोसांज यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पंजाबमधील तरूण अमली पदार्थाच्या आहारी कसे जात आहेत, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

काँग्रेस, आप आणि अन्य राजकीय पक्षांनी या वादापासून दूर राहावे. हा प्रमाणपत्र मंडळ आणि आपल्यातील लढा आहे, आपण केवळ आपलेच म्हणणे मांडणार आहोत, आपला लढा मंडळाविरुद्ध नाही तर हुकूमशहा वृत्तीशी आहे, असेही अनुराग कश्यप यांनी म्हटले आहे.