११ वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडणाऱ्या आणि एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध फेरसुनावणीचा खटला चालविण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच सत्र न्यायालयाने दिले. या निर्णयाला आव्हान देण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागण्यात आली असून लवकरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.  
दरम्यान, न्यायालयाने फेरखटल्याची सुनावणी ७ जानेवारीपर्यंत तहकूब केली असून त्या वेळी खटल्याचे कामकाज नेमके कधीपासून सुरू केले जाईल याची तारीख निश्चित करण्यात येईल.
सलमान खटल्यातील सरकारी वकिलांनी फेरसुनावणीच्या निर्णयाला आव्हान देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे केली आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे हे योग्य प्रकरण असून कायद्यात अशाप्रकारे नव्याने खटला चालविण्याचे आणि आतापर्यंत नोंदविण्यात आलेला सर्व पुरावा नव्या खटल्यात ग्राह्य न धरण्यात येणार नाही, असे आदेश देण्याची तरतूद नसल्याचा दावा सरकारी वकिलांनी अपीलाची मागणी करताना केला आहे.
सत्र न्यायालयाने ५ डिसेंबर रोजी सलमानची नव्याने खटला चालविण्याची मागणी मान्य केली होती. तसेच नव्या खटल्यादरम्यान जुन्या खटल्यात नोंदविण्यात आलेला साक्षीपुरावा ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.