28 February 2021

News Flash

चेहरे पे चेहरा

‘वन वे तिकीट’ या चित्रपटासाठी गश्मीरने प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर करून गूढ व्यक्तिरेखा रंगवली होती.

प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर करून नवा चेहरा चढवण्याचा प्रकार येत्या काही चित्रपटांमधून मोठय़ा प्रमाणावर दिसणार आहे.

बॉलीवूडच्या चौकटीतील व्यावसायिक मसालापटांमध्ये फारसे काही प्रयोग करण्याची संधी मोठमोठय़ा कलाकारांना मिळत नाही. त्यातल्या त्यात भूमिके नुसार वेगळा लुक, पेहराव, देहबोली, संवादाची ढब बदलणं आणि सरतेशेवटी अभिनयाची जोड असे छोटे-मोठे प्रयोग करत आपल्या वाटय़ाला आलेली भूमिका सुफळ संपूर्ण करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू असतो. त्यामुळे जेव्हा कधी चेहऱ्यावर नवा चेहरा चढवून काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते तेव्हा ती अक्षरश: खेचून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. प्रॉस्थेटिक मेअकप हा प्रकार हॉलीवूडप्रमाणेच इथेही रुळू लागला आहे. आपल्याकडच्या रंगभूषाकारांनीही यात असलेला आपला हातखंडा दाखवून दिला आहे. भरीस भर म्हणून सध्या ज्या प्रकारचे प्रयोग चित्रपटांमध्ये सुरू आहेत त्यामुळे प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर करून नवा चेहरा चढवण्याचा प्रकार येत्या काही चित्रपटांमधून मोठय़ा प्रमाणावर दिसणार आहे.

सध्या ‘राबता’ या चित्रपटात राजकुमार रावने साकारलेल्या ३२४ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात दिसणारा जख्खड चेहरा हा राजकुमारचा आहे हे सांगितल्याशिवाय कोणालाही लक्षात आलं नाही इतक्या अप्रतिम पद्धतीने त्याचा मेकअप करण्यात आला आहे. याआधी अशाप्रकारे ‘धूम २’मध्ये हृतिक रोशनने प्रॉस्थेटिकचा वापर करून चेहऱ्यांवर चेहरे बदलले होते. ‘पा’साठी सत्तर वर्षांच्या अमिताभना एका लहान मुलात रूपांतरित करणारी प्रॉस्थेटिक मेकअपची जादू थक्क करावी अशीच होती. याआधी कित्येकदा अशा भूमिकांसाठी परदेशातून रंगभूषाकारांना बोलावून प्रॉस्थेटिक मेकअप के ला जायचा. आता प्रॉस्थेटिक मेकअप ही फक्त त्यांची मक्तेदारी राहिलेली नाही. त्यामुळे याचा सर्रास वापर हिंदी चित्रपटांमधून होऊ लागला आहे. प्रॉस्थेटिक मेकअपचा प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या पद्धतीने आणि खुबीने कोणी केला असेल तर तिथे फक्त कमल हसनचंच नाव घ्यावं लागतं. ‘अप्पु राजा’, ‘मेजरसाब’, ‘हिंदुस्थानी’, ‘चाची ४२०’, ‘विश्वरूपम’, ‘दशावतार’मध्येही त्याने दहा चेहरे बदलले होते. आता आलेल्या चित्रपटांमध्ये ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’मधील ऋषी कपूर यांनी प्रॉस्थेटिकचा वापर करून रंगवलेला आजोबाही भलताच लोकप्रिय झाला होता.

प्रॉस्थेटिक मेकअपसाठी लागणारा वेळ आणि चित्रीकरण सुरू असताना प्रत्येक दिवशी तो मेकअप चढवून भूमिका करणे हे कलाकारांसाठी त्यांच्या संयमाची परीक्षा पाहणारे असते. मात्र त्या भूमिकांमुळे जी लोकप्रियता कलाकारांच्या वाटय़ाला येते ती पाहता अशा भूमिका मिळवण्यावरच त्यांचा कल जास्त असतो. शाहरूख खाननेही ‘फॅन’ चित्रपटात गौरवची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रॉस्थेटिकचा आधार घेतला होता. ‘बाहुबली’ या चित्रपटात देवसेनेच्या भूमिकेसाठी अनुष्का शेट्टीलाही प्रॉस्थेटिक मेकअपच्याच साहाय्याने वयोवृद्ध देवसेनेचा चेहरा चढवण्यात आला. मराठीतही प्रॉस्थेटिक मेकअप वापरून एका वेगळ्या चेहऱ्यात वावरण्याची किमया गश्मीर महाजनी, चिन्मय मांडलेकर आणि शरद केळकर सारख्या कलाकारांनी केला आहे. ‘वन वे तिकीट’ या चित्रपटासाठी गश्मीरने प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर करून गूढ व्यक्तिरेखा रंगवली होती. चिन्मय मांडलेकरने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचा चेहरा मिळवण्यासाठी तर शरद केळकरने गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा हुबेहूब चेहरा दिसावा यासाठी प्रॉस्थेटिक मेअकपचा आधार घेतला होता. आगामी चित्रपटांमध्ये मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदु सरकार’ या चित्रपटात संजय गांधी यांच्या भूमिकेसाठी अभिनेता नील नितीन मुकेशचा चेहरा प्रॉस्थेटिक मेकअपने बदलण्यात आला आहे. तर हसिना पारकरच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरनेही प्रॉस्थेटिकचा वापर केला आहे. हिंदी चित्रपटांमधून सातत्याने कथा-व्यक्तिरेखा यांच्या मांडणीत प्रयोग सुरू असल्याने प्रॉस्थेटिक मेकअपची ही किमया येत्या काही वर्षांत आपल्याच कलाकारांचे अगदी नवे चेहरे आपल्याला दाखवणार आहे.

‘राबता’च्या भूमिके साठी संयम राखणे हे आव्हान होते -राजकुमार राव

‘राबता’चा विषय वेगळा आहे. त्यात माझी भूमिका छोटेखानी आहे. ३२४ वर्षांच्या म्हाताऱ्याची ही भूमिका मी स्वीकारली होती ती दिनेश विजन आणि होमी अदजानिया या दोघांनी केलेल्या विनंतीमुळे.. दिनेशने दिग्दर्शक म्हणून मला या भूमिकेसाठी खूप स्वातंत्र्य दिले. पण खरं आव्हान होतं ते मेकअपचं. एकतर तो मेकअप चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठीही कितीतरी तास लागतात. त्यात भूमिका छोटी असूनही हे प्रॉस्थेटिकचं शिवधनुष्य पेलणं आवश्यक होतं. त्या मेअकपच्या थराखाली आतमध्ये अक्षरश: घामाने चिंब भिजून गेलेलो असायचो. मात्र आत काय सुरू आहे याची जराही जाणीव चेहऱ्यावर दिसू न देता मला ती भूमिका करायची होती. या भूमिकेसाठी संयम राखणं हेच माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 3:15 am

Web Title: prosthetic makeup in bollywood movies
Next Stories
1 ‘स्वप्नपंख’ सत्तरच्या दशकातलं नाटक
2 ‘एफयू’ कॉलेज जीवनाचा ‘नॉस्टेल्जिया’!
3 व्यसनाचा वटवृक्ष!
Just Now!
X