हृदयेश आर्ट्स संस्थेचा वर्धापन दिन, ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे ८० व्या वर्षांत पदार्पण आणि त्यांच्या ‘भावसरगम’ या कार्यक्रमाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष यानिमित्ताने २६ ऑक्टोबर रोजी एका खास सोहळ्याचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ‘भावसरगम’चा विशेष प्रयोग यावेळी सादर होणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. जसराज यांना यंदाचा हृदयेश आर्ट्सचा ‘हृदयनाथ’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्ताने..

हृदयनाथ माझा धाकटा भाऊ असला तरी मी त्याला माझा ‘गुरू’ मानते. वयाने लहान असला तरी कर्तृत्वाने तो खूप मोठा आहे. त्याचा संगीताचा अभ्यास प्रचंड आहे. अर्थात त्यासाठी त्याने अपार कष्ट घेतले आहेत. त्यातूनच त्याने संगीत क्षेत्रात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान व वेगळी शैली निर्माण केली आहे. आमिर खॉं साहेबांचा गंडा त्याने लहानपणीच बांधला. आमचे बाबा गेले ते तेव्हा तो अवघा चार वर्षांचा होता. सतत आजारी असायचा. त्यातच त्याच्या पायाला गंभीर आजार झाल्याने आम्ही सगळेच तेव्हा खूप काळजीत होतो. पुण्याच्या सर्व निष्णात डॉक्टरांना दाखविले. त्याचा पाय कापावा लागेल, तो चालूच शकणार नाही, असे सांगून डॉक्टरांनी आम्हाला घाबरवून सोडले होते. दरम्यान पुण्याहून आम्ही कोल्हापूरला राहायला गेलो होतो. दुखऱ्या पायाचा त्याला प्रचंड त्रास व्हायचा, धड चालता यायचे नाही, आशाच त्याला उचलून घेऊन जायची. अशात जडीबुटी व झाडपाल्याचा उपयोग करून औषधोपचार करणाऱ्या एका खेडवळ दिसणाऱ्या माणसाशी आमची भेट झाली. आम्ही बाळला त्याला दाखविले. त्याने कसलासा  पाला औषध म्हणून दिला आणि पाण्यात गरम करून तो त्याच्या पायावरील जखमेवर बांधायला सांगितला. त्या उपायाने त्याचा पाय बरा झाला, पण पायात थोडासा दोष राहिला.

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
rohit pawar slams ram kadam ashish shelar
“सभागृहात अ‍ॅक्टिंग कशाला करताय? होय, आहे योगेश सावंत आमचा कार्यकर्ता”, रोहित पवारांचा राम कदमांवर हल्लाबोल!
Amit Shah Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंसाठी एनडीएचे दरवाजे खुले आहेत? गृहमंत्री अमित शाह म्हणाले…
Rashmi Shukla
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत काळजी घ्या; महासंचालकांचे आदेश

हृदयनाथने संगीतबद्ध केलेली अनेक गाणी मी गायले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांना चालीत बांधून ते अभंग त्याने लोकांपुढे आणले. त्यातील ‘मोगरा फुलला’ या अभंगाची त्याने केलेली चाल, त्या अभंगाचा समजावून दिलेला अर्थ यामुळे मी त्याला माझा ‘गुरू’ मानायला लागले. ‘मोगरा फुलला’ गात असताना तो माझ्यापाशी आला व तो अभंग मला समजावून सांगितला. हा अभंग लिहिताना ज्ञानेश्वर त्यांच्यावर झालेला अन्याय, समाजाने त्यांना दिलेली वागणूक, केलेला छळ हे सगळे विसरून गेले होते. त्यांचे मन, सारा देह आणि विचार हे पूर्णपणे निर्विकार झाले होते असा विचार मी या अभंगाचा केला आहे. जी अवस्था ज्ञानेश्वरांची होती तसा निर्विकार भाव या अभंगातून व्यक्त व्हावा, दीदी ते तुझ्या गळ्यातून यावे, असे बाळने मला समजावून सांगितले. आज इतक्या वर्षांनंतरही या अभंगाची आणि ज्ञानेश्वरांच्या अन्य अभंगांची गोडी कमी झालेली नाही. यातील ‘घनू वाजे रुणझुणा’ सह सर्व अभंग आजही लोकप्रिय आहेत. यात ज्ञानेश्वरांच्या शब्दांचा सर्वात मोठा वाटा आहेच, पण अभंगांच्या चालीचे व संगीताचेही महत्त्वाचे योगदान आहे. बाळने केवळ अभंगांना चाल लावली नाही तर त्याने या सगळ्या अभंगांचा वेगळ्या पद्धतीने विचार केला, त्याचा अर्थ लावला. पुढे आम्ही ‘श्रीमद्भगवद्गीता’ केली. यातील श्लोकांना त्याने भूप, यमन आदी वेगवेगळ्या रागात बांधले. संत मीरा, कबीर, सुरदास यांचेही अभंग आम्ही केले. तसेच हृदयनाथने गालिबही तितक्याच ताकदीने केला. त्याचा गालिब पाकिस्तानातही लोकप्रिय आहे. हे सर्व करताना त्याने प्रचंड वाचन, अभ्यास केला आणि त्या सगळ्यासाठी मी त्याला माझा ‘गुरू’ मानते.

‘भावसरगम’ करण्यापूर्वी हृदयनाथ मराठी/हिंदी गाण्यांचा एक कार्यक्रम करायचा. त्यावेळी या कार्यक्रमात उषा, मीना ही गायल्या आहेत. हृदयनाथबरोबर तेव्हा प्यारेलाल, त्याचा भाऊ गोरख, आनंद, लक्ष्मीकांत आणि इतर मंडळी या कार्यक्रमात असायची. एकदा एका कार्यक्रमाला मी गेले होते. कार्यक्रम सुरू असताना  हृदयनाथने मला व्यासपीठावर बोलाविले आणि एक गाणे गायला सांगितले त्याच्या विनंतीला मान देऊन मी त्या वेळी एक गाणे म्हटलेही. त्यांच्या एका कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार नौशाद आले होते. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या एका गाण्याची धून हृदयनाथने अगदी बरोबर वाजविली की नौशादजींनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली. पुढे हृदयनाथने हाच गाण्यांचा कार्यक्रम ‘भावसरगम’ या नावाने सुरू केला. आज या कार्यक्रमाचेही सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

हृदयनाथची गाणी म्हणायला सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष गाताना ती किती कठीण असतात ते कळते. त्याचा जास्त ओढा कठीणतेकडेच आहे. त्याच्याकडे मी अनेक गाणी गायली आहेत. प्रत्येक गाणे गाताना मला खूप भीती वाटायची, आपली फजिती तर होणार नाही ना, असे वाटायचे. ‘मी डोलकर डोलकर’, ‘माझ्या सारंगा’ ही गाणी तशी सोपी आहेत पण ‘ मालवून टाक दीप’, ‘घन तमी शुक्र बघ राज करी’ ही व अन्य गाणी गायला कठीण आहेत. त्याला रागाचे, तालाचे आणि सुराचे ज्ञान खूप चांगले आहे. प्रत्येक गाणे संगीतबद्ध करताना त्याने या सगळ्याचा पुरेपूर वापर केला आहे. त्यामुळे विविध शैलीतील गाणी त्याने दिली असून ती सर्व गाणी इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या गळ्यात आणि ओठावर आहेत. कोणत्या चांगल्या कवितेचे उत्तम गाणे होऊ शकते याची नेमकी जाण त्याला आहे. त्यामुळे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, ग्रेस, सुरेश भट यांच्या चांगल्या कविता ही उत्तम गाणी म्हणून रसिकांपुढे आली. संगीत या कलेबरोबरच त्याच्याकडे उत्तम लेखनकलाही आहे. तो छान लिहितो.

मी, आशा, मीना, उषा आम्हा सगळ्या बहिणींचा तो लाडका भाऊ आहे. आम्हा सर्व बहिणींसाठी तो सर्वस्व आहे. त्याच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.

लता मंगेशकर

(शब्दांकन- शेखर जोशी)