इराकमध्ये झालेल्या २००३ च्या युद्धाची पाश्र्वभूमी

जगात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या पुलित्झर पुरस्काराचं नामांकन लाभलेल्या ‘बंगाल टायगर अ‍ॅट द बगदाद झू’  या नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. रंगदृष्टी या संस्थेची निर्मिती आणि निरंजन पेडणेकरचं दिग्दर्शन असलेल्या या नाटकाचा प्रयोग शनिवारी (१० मार्च) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे रात्री साडेनऊ वाजता  होणार आहे.

अमेरिकन लेखक राजीव जोसेफ यांनी ‘बंगाल टायगर अ‍ॅट द बगदाद झू’ हे नाटक लिहिलं आहे. त्याला पाश्र्वभूमी आहे इराकमध्ये झालेल्या २००३ च्या युद्धाची. सद्दाम हुसेनचा पाडाव झाल्यानंतर अमेरिकन फौजा इराकमध्ये तळ ठोकून असतात. बगदादमधल्या प्राणिसंग्रहालयावर बॉम्बहल्ले होतात आणि काही पिंजरे उद्ध्वस्त होऊन त्यातले प्राणी पळून गेले आहेत.

अशातच एक वाघ पिंजऱ्यामध्ये अडकून पडला आहे. दोन अमेरिकन सैनिक त्या पिंजऱ्यावर पाळत ठेवून आहेत. हुसेन राजवाडय़ातून सोन्याची कमोड सीट चोरलेला त्यातला एक अमेरिकन सैनिक वाघाला खायला घालायचा मूर्खपणा काय करतो आणि त्यानंतर अनेक आयुष्यं कशी बदलतात हे नाटकाचं कथानक आहे.  यापूर्वी  हे नाटक अमेरिकेत गाजलं आहे. त्याला २००९ मध्ये पुलित्झर पारितोषिकाचं नामांकन मिळालं होतं. मूळ नाटक इंग्रजीत असून, निरंजनने त्यातला काही भाग हिंदी—उर्दूमध्ये रूपांतरित केला आहे. नाटकात शुभंकर एकबोटे, ऋतुराज शिंदे, नाथ पुरंदरे, आनंद पोटदुखे आणि इंद्रजित मोपारी यांच्या भूमिका आहेत.

नाटकाविषयी निरंजन म्हणाला, युद्धामध्ये अडकलेल्या जिवांचा राजीव जोसेफ यांनी एकाहून एक विचित्र आणि खरंतर विनोदी नाटय़प्रसंगांतून वेध घेतला आहे. युद्ध, अपराध, देव, जीवन—मृत्यू यांच्या कचाटय़ातल्या माणसाची त्रिशंकू अवस्था ट्रॅजिकॉमेडी पद्धतीनं मांडली आहे. अतिशय वेगळ्या धाटणीचं असं हे नाटक आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं, या हेतूनं ते रंगमंचावर आणलं आहे.

chinmay.reporter@gmail.com