पुण्यातील युवा रंगकर्मी आणि प्रयोगशील दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याचे नाव प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीमध्ये झळकले आहे. ‘फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत आशिया खंडातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या युवांपैकी ‘आश्वासक ३०’ युवक-युवतींना या विशेष यादीमध्ये स्थान दिले असून त्यामध्ये निपुणचा समावेश झाला आहे.

फोर्ब्सतर्फे देशातील ‘युवा टॅलेंट’चा समावेश असणारी अशा स्वरूपाची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये निपुण धर्माधिकारी याचा समावेश होता. आता फोर्ब्सने आशिया खंडातील आश्वासक ३० युवक-युवतींची सूची केली असून त्यामध्ये निपुणने मराठी रंगभूमीचा झेंडा फडकावत स्थान पटकाविले आहे. यामध्ये संगीत, क्रीडा, रंगभूमी, ई-कॉमर्स, साहित्य, कायदा, माहिती तंत्रज्ञान अशा विविध दहा क्षेत्रांतील ३० वर्षांखालील युवकांचा या यादीमध्ये अंतर्भाव केला आहे. या यादीमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्यासह ५६ भारतीयांचा समावेश आहे.

‘नाटक कंपनी’ या युवा रंगकर्मीच्या नाटय़संस्थेमार्फत निपुण याने ‘दळण’, ‘लुज कंट्रोल’, ‘सायकल’ या एकांकिकांसह ‘एक दिवस मठाकडे’ या दीर्घाकाचे दिग्दर्शन केले आहे. युवा गायक राहुल देशपांडे याच्यासमवेत ‘संशयकल्लोळ’, ‘मानापमान’ आणि ‘सौभद्र’ ही संगीत नाटके वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शित करून त्याने युवा पिढीला संगीत रंगभूमीकडे आकर्षित केले. त्याने ‘स्नॉवेल’ कंपनीच्या सहकार्याने प्रभाकर पेंढारकर यांच्या ‘रारंगढांग’ या कादंबरीचे ऑडिओबुक केले असून, प्रकाश नारायण संत यांच्या ‘वनवास’ या कथासंग्रहाचे ऑडिओबुक केले आहे. ‘नौटंकी साला’ या चित्रपटाचे लेखन केले असून आता त्याने आणखी एका चित्रपटाची कथा-पटकथा लिहिलेली आहे.

खास युवकांसाठीच्या यादीमध्ये माझे नाव आशिया खंडामध्ये समाविष्ट झाले याचा विशेष आनंद झाला असल्याची भावना निपुण धर्माधिकारी याने व्यक्त केली. विराट कोहली, सायना नेहवाल यांच्या पंक्तीमध्ये मी गेल्यामुळे भारी वाटते. आपण करीत असलेले काम कोणीतरी पाहत आहे आणि त्याला महत्त्व देऊन या कामाची दखल घेतली गेली याचे समाधान आहे. या गौरवामुळे एक नवी ऊर्जा मिळाली असली तरी रंगभूमीवर आणखी चांगले काम केले पाहिजे ही जबाबदारी वाढली असल्याचीही जाणीव होत आहे, असे निपुणने सांगितले.