रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (आरसीबी) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) अष्टपैलू खेळाडू हरप्रीत ब्रारने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले. फलंदाजीत हरप्रीतने २५ धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीत त्याने विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद करत बंगळुरूचे कंबरडे मोडले. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

हरप्रीत हा पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या आठवड्यात एका सोशल मीडिया वापरकर्त्याने त्याची तुलना ‘सिंग इज ब्लींग’ या चित्रपटात काम करणार्‍या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारशी केली. पण हरप्रीतला ही गोष्ट आवडली नाही आणि त्याने संबधित ट्विटला प्रत्युत्तर दिले. या ट्विटमध्ये त्याने अक्षयला टोमणा मारला.

 

अक्षयने सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘सिंग इज ब्लींग’ चित्रपटात पगडी घातलेला शीख व्यक्ती साकारला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. याबाबत वापरकर्त्याने हरप्रीतला सांगितले, ”पाजी तु्म्ही सिंग इज ब्लींग चित्रपटातील अक्षय कुमारसारखे दिसत.” हरप्रीतला ही गोष्ट आवडली नाही. त्याने प्रत्युत्तरात ट्विट केले, ”आम्ही पैशासाठी पगडी घालत नाही.” या ट्विटसह त्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा म्हणून एक हॅशटॅगही पोस्ट केला.

पंजाबचे आव्हान कायम

हरप्रीतच्या कामगिरीमुळे पंजाबने बंगळुरुवर ३४ धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. या विजयासह गुणतालिकेत पंजाबचा संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पंजाबने ५ गडी गमवत १७९ धावा केल्या होत्या आणि विजयासाठी १८० धावांचे आव्हान दिले होते. मात्र बंगळुरुचा संघ ८ गडी गमवून १४५ धावा करू शकला. हरप्रीतचा हा आयपीएलचा तिसरा हंगाम आहे. या स्पर्धेत त्याने चार सामन्यात ४५ धावा केल्या असून तीन विकेट्स घेतल्या आहेत.