अभिनेता पुरब कोहली व त्यांच्या कुटुंबीयांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित पुरबने याबद्दलची माहिती दिली. सुरुवातीला ताप व सर्दीची लक्षणे दिसली आणि नंतर डॉक्टरांशी संपर्क केला असता COVID 19 ची लागण झाल्याचे समजले, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आमच्यात नेहमीच्या तापाची व सर्दीची लक्षणे दिसली. श्वसनाचा त्रास जाणवला. डॉक्टरांनी आम्हाला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं. माझी मुलगी इनाया हिला पहिल्यांदा करोनाची लागण झाली. त्यानंतर पत्नी लुसी व मला ताप आला. चार-पाच दिवसांनी ताप कमी झाला पण सर्दी अजूनही तशीच होती. आम्ही सगळे क्वारंटाइनमध्ये होतो”, असं त्याने सांगितलं. त्याचसोबत बुधवारी पुरब व त्याचे कुटुंबीय क्वारंटाइनमधून बाहेर आल्याचंही त्याने सांगितलं.

करोनापासून वाचण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी घरीच काही काळजी घेतली. त्याबद्दलही त्याने लिहिलं, “आम्ही दिवसातून चार ते पाच वेळा वाफ घ्यायचो. मिठाच्या पाण्याने गुळण्या करायचो. आलं, हळद आणि मध यांचं मिश्रण करून घेतल्याने घसा खवखवणं कमी झालं. गरम पाण्याने अंघोळ करत होतो. याशिवाय दिवसभर आराम करत होतो. आता दोन आठवडे झाले आहेत. मात्र अजूनही आम्ही त्यातून ठीक होत आहोत असं वाटतंय.”

पुरबने सर्वांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याचसोबत कोणाला करोनाची लागण झाली तर तुमचं शरीर खूप कणखर आहे आणि तुम्ही करोनाविरुद्ध लढा देऊ शकता, हे लक्षात ठेवा, असंही त्याने म्हटलंय. लोकांनी घाबरण्याचं काही कारण नाही, असं म्हणत त्याने सर्वांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. पुरब व त्याचे कुटुंबीय सध्या लंडनमध्ये राहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purab kohli and his family test positive for coronavirus ssv
First published on: 07-04-2020 at 19:00 IST