15 October 2019

News Flash

मेट्रो तर हवीय पण आरेच्या सद्य स्थितीतल्या जंगलासह- पुष्कर श्रोत्री

खड्डेमय रस्ते पाहून त्याने गाडी आणि रस्त्याच्या नादाला लागायचंच नाही असा निर्णय घेतला आहे.

पुष्कर श्रोत्री

खड्डेमय रस्त्यांवरून दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य लोक एकीकडे मिळेल त्या माध्यमातून वेदना मांडत असताना मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही यात आपला आवाज सामील केला आहे. गेल्या काही दिवसांत अभिनेते प्रशांत दामले, प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, सुबोध भावे यांच्यासह अभिनेता पुष्कर श्रोत्रीनेही आवाज उठवला आहे. मुंबईतील इतर भागांत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोरील रस्ता कसा गुळगुळीत आहे, असा सवाल पुष्करने केला होता. त्यानंतर आता त्याने गाडी आणि रस्त्याच्या नादाला लागायचंच नाही असा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील एका नाटकाच्या प्रयोगाला जाण्यासाठी पुष्करने मेट्रो व रेल्वेचा पर्याय स्वीकारला. त्याचसोबत मेट्रो तर हवी आरेतील झाडांच्या किंमतीवर नको, असं ठाम मत त्याने ट्विटरवर मांडलंय.

मेट्रो व रेल्वे प्रवासाचा एक व्हिडीओ पोस्ट करत पुष्करने लिहिलं, ”ठाण्यात ‘परफेक्ट मर्डर’चा प्रयोग! ठरवलं, गाडीच्या आणि रस्त्याच्या नादाला लागायचंच नाही. अंधेरी ते घाटकोपर मेट्रो आणि घाटकोपर ते ठाणे मध्य रेल्वेने प्रवास, (मेट्रो तर हवीय पण आरेच्या सद्य स्थितीतल्या जंगलासह! काही लोक ‘आरे’ला वन क्षेत्र जाहीर करायचं का नाही, ह्या विवंचनेत आहेत!)”

आरेमधील मेट्रो कारशेडसाठी सात जागांचा पर्याय दिलेला असतानादेखील, आरेतील दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्याचा पर्याय मंजूर झाल्याने मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एकीकडे रस्त्यांची अवस्था बघता मेट्रोचा पर्याय जरी स्वीकारायचा म्हटल्यास मुंबईकरांना ‘आरे’तील वृक्ष गमवायचे नाहीत. त्यामुळे आरेच्या सद्य स्थितीतल्या जंगलासह मेट्रो हवी, अशी मागणी पुष्करने केली आहे.

पुष्कर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात १५ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता प्रयोग होता. यासाठी विलेपार्ले येथून पोहोचायला त्याला सव्वा तीन तास लागले. तर अभिनेता अनिकेत विश्वासराव याला सव्वा चार तास लागले. हे सगळं फक्त आणि फक्त या रस्त्यावर पडलेले महाकाय खड्डे आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे झाल्याचे त्याने एका व्हिडीओद्वारे सांगितले होते.

First Published on September 23, 2019 3:53 pm

Web Title: pushkar shrotri tweet on mumbai metro and aarey trees ssv 92