दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात आनंदवन समूहातील सर्व प्रकल्प पाहण्यासाठी कुटुंबीयांसह गेलेल्या ठाण्यातील पुष्पा आगाशे यांना आपल्याला पुढच्याच महिन्यात चित्रपटात साधनाताई आमटे यांची भूमिका साकारण्याची संधी मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र सत्य हे अनेकदा कल्पनेपेक्षा अधिक अद्भुत असते याचा प्रत्यय घेत अभियनाचा कोणताही पूर्वानुभव नसताना त्यांनी ही भूमिका साकारली.
श्रीपाद आणि पुष्पा आगाशे हे ठाण्यातील दाम्पत्य गेल्या तीन दशकांहून अधिक काळ नेत्रदान चळवळीत कार्यरत आहेत. बाबा आमटे यांचे आनंदवन तसेच या परिवारातील इतर प्रकल्पांना भेट देण्याची त्यांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. तो योग नोव्हेंबर-२०१२ मध्ये जुळून आला. योगायोग म्हणजे हेमलकसा येथे त्याच वेळी प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या पूर्वतयारीसाठी दिग्दर्शिका समृद्धी पोरेही तिथे आल्या होत्या. चित्रपटातील पात्रनिवड सुरू होती. पुष्पा आगाशेंना पाहताच समृद्धी पोरेंना त्यांच्या चित्रपटातील साधनाताई आमटे मिळाल्या. त्यांनी लगेचच त्यांना चित्रपटात काम करण्याची विनंती केली.
सुरुवातीला पुष्पा आगाशेंनी त्यास स्पष्ट नकार दिला. कारण एकतर त्यांनी त्यापूर्वी कधीही अभिनय केला नव्हता. शिवाय नोकरीच्या काळात डार्करूममध्ये काम करण्याच्या सवयीमुळे भडक उजेडाचा त्यांना त्रास होतो. त्यांचे डोळे लगेच मिटून जातात. साधे छायाचित्र काढतानाही बराच त्रास होतो, तर चित्रीकरण कसे होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मात्र इतर तांत्रिक बाबी आम्ही सांभाळून घेऊ, तुम्ही फक्त तयार व्हा. असा दिलासा समृद्धी पोरेंनी दिल्यावर त्या भूमिका साकारण्यासाठी तयार झाल्या. पुढल्याच डिसेंबर महिन्यात हेमलकसा येथे बाबा आमटेंची भूमिका साकारीत असलेले मोहन आगाशे, सुशांत शेलार आणि तेजश्री प्रधान (तरुणपणातील प्रकाश-मंदाकिनी आमटे) यांच्यासोबत दोन दिवस त्यांनी चित्रीकरणात भाग घेतला. योगायोग म्हणजे नेत्रदान चळवळीनिमित्त पुष्पा आगाशेही समाजसेवेत कार्यरत आहेत. अंध विद्यार्थ्यांना अभ्यासात रीडर म्हणून त्या मदत करतात.
हे तर भाग्यच..!
सहज सहलीला गेले असताना केवळ चेहऱ्यातील साधम्र्यामुळे एका मोठय़ा समाजसेविकेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. चित्रपटात फक्त पडद्यावरील कलावंत दिसतात, पण दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि इतर साहाय्यक किती कष्ट घेतात, हे त्यानिमित्ताने पहायला मिळाले. एक नवा अनुभव गाठीशी आला.
पुष्पा आगाशे