फेब्रुवारी महिना हा खऱ्या अर्थाने सिनेप्रेमींसाठी ‘ऑस्कर’चा महिना आहे. ऑस्कर पुरस्कारांसाठी स्पर्धेत असलेल्या हॉलीवूडपटांबद्दल जगभरातील प्रेक्षकांमध्ये औत्सुक्य असते. गेल्या काही वर्षांत हॉलीवूडपटांना भारतातही वाढती मागणी असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘पीव्हीआर’ समूहाने ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी नामांकित चित्रपट येथे दाखवण्यावर भर दिला होता. याही वर्षी ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी सर्वाधिक नामांकने मिळवणाऱ्या ‘द रेव्हनंट’ या लिओनार्दो दी कॅप्रिओच्या चित्रपटासह स्पर्धेत असलेल्या चित्रपटांचा महोत्सव ‘पीव्हीआर’ने आयोजित केला आहे.
‘पीव्हीआर’च्या वतीने १९ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान ‘ऑस्कर’ नामांकित चित्रपटांची पर्वणी सिनेरसिकांना मिळणार आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगळुरू, चंदिगढ, कोचिन अशा ११ शहरांमध्ये ‘पीव्हीआर’ने ‘द ऑस्कर फि ल्म फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. ८८ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेले ‘रूम’, ‘द हेटफुल एट’, ‘अॅमी’, ‘ट्रम्बो’ असे चित्रपट या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. ‘अॅकॅडमी पुरस्कारांबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑस्करचा हा आशय भारतातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जागतिक चित्रपटांना ‘पीव्हीआर’च्या वतीने देण्यात आलेली ही सलामी असून या वर्षी आयोजित करण्यात आलेला ऑस्कर नामांकित चित्रपटांचा महोत्सव लोकांना आवडेल’, असा विश्वास ‘पीव्हीआर’चे सहव्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार बिजली यांनी व्यक्त केला.